मुंबई: अलिकडच्या इतिहासातील सेन्सेक्स-निफ्टीतील मोठ्या घसरणीचा महिना राहिलेल्या ऑक्टोबरमध्ये, गुंतवणूकदारांनी समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये मोठी गुंतवणूक केली, परिणामी या महिन्यांत या फंडांनी ४१,८८७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा विक्रमी प्रवाह अनुभवला, असे सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. भांडवली बाजाराचा कल प्रचंड नकारात्मक असूनही, मासिक आधारावर इक्विटी फंडातील ओघ सुमारे २२ टक्के अधिक राहिला.

उपलब्ध आकडेवारीनुसार, समभागसंलग्न अर्थात इक्विटी योजनांनी ऑक्टोबरमध्ये ४१,८८७ कोटी रुपयांचा नक्त प्रवाह पाहिला, जो सप्टेंबरमध्ये आलेल्या ३४,४१९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत २१.७ टक्क्यांनी वाढला आहे. याआधी जून २०२४ मध्ये इक्विटी योजनांमध्ये ४०,६०८ कोटी रुपयांचा तोवरचा सर्वाधिक ओघ दिसून आला होता. उल्लेखनीय म्हणजे समभागसंलग्न फंडांमध्ये सकारात्मक प्रवाहाचा हा सलग ४४ वा महिना असून, गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडांच्या वाढत्या आकर्षणाला याने अधोरेखित केले आहे, असे ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (ॲम्फी)’ सोमवारी मासिक आकडेवारी प्रसिद्ध करताना म्हटले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>> ‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण

किरकोळ म्युच्युअल फंड खाती अर्थात फोलिओंच्या संख्येने १७.२३ कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठण्यातून या उद्योगाची मजबूत वाढ दिसून येते, असे ‘ॲम्फी’चे मुख्य कार्यकारी व्यंकट चालसानी यांनी सांगितले. ऑक्टोबरमधील शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची चांगली संधी उपलब्ध झाली आणि या संधीचे सोने करण्यास ते चुकले नाहीत, अशी त्यांनी पुस्ती जोडली. सरलेल्या ऑक्टोबरमध्ये फोलिओंच्या संख्येत ३९.४७ लाखांनी भर पडली आहे.
एकंदरीत, म्युच्युअल फंड उद्योगाने सप्टेंबरमध्ये ७१,११४ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याचे अनुभवल्यानंतर, सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात २.४० लाख कोटी रुपयांचा ओघ अनुभवला. रोखेसंलग्न अर्थात डेट योजनांमध्ये १.५७ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे एकंदर ओघ प्रचंड वाढला. या दमदार प्रवाहाने देशातील सर्व म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील निव्वळ मालमत्ता सप्टेंबरमधील ६७ लाख कोटींवरून वाढून ऑक्टोबरमध्ये ६७.२६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

इक्विटी फंडांच्या श्रेणीमध्ये, थीमॅटिक फंडांनी १२,२७९ कोटी रुपयांच्या निव्वळ प्रवाहासह गुंतवणूकदारांना सर्वाधिक आकर्षित केले. तथापि, सप्टेंबरमधील १३,२५५ कोटी रुपयांच्या तुलनेत या फंडातील प्रवाह काहीसा घटला आहे. ताज्या प्रवाहासह, थीमॅटिक फंड हे समभागसंलग्न गटातील आता सर्वात मोठी श्रेणी बनली असून, या फंडांची एकूण मालमत्ता ४.५ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. तथापि, लार्ज कॅप, मल्टीकॅप, लार्ज आणि मिडकॅप तसेच फ्लेक्सीकॅप यासारख्या अन्य फंड प्रकारांतही गुंतवणूकदारांचे लक्षणीय स्वारस्य दिसून आले.

मासिक ‘एसआयपी’ ओघ २५ हजार कोटींपल्याड

शिस्तशीर गुंतवणुकीचा लोकप्रिय मार्ग बनलेल्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’मधील मासिक योगदान सप्टेंबरमधील २४,५०९ कोटी रुपयांवरून, सरलेल्या महिन्यात २५,३२३ कोटी रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले. ‘एसआयपी’ खात्यांमध्येही निरंतर वाढ सुरू असून ती आता १०.१२ कोटींहून अधिक झाली आहेत. विक्रमी मासिक योगदानासह गुंतवणूकदारांमध्ये शिस्तबद्ध गुंतवणुकीला वाढती पसंती मिळत असल्याचे यातून दर्शविले गेले आहे. या विक्रमी ‘एसआयपी’ ओघामुळे परकीय गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये ९४,००० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करून बाहेरचा रस्ता धरला असताना, म्युच्युअल फंडांकडून सुरू राहिलेल्या खरेदीने बाजारातील अस्थिरतेवर अंकुश ठेवला गेला.

Story img Loader