पीटीआय, नवी दिल्ली
देशाच्या निर्मिती क्षेत्राचा वेग सरलेल्या ऑगस्ट महिन्यात मंदावल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले. या क्षेत्राच्या सक्रियता तीन महिन्यांच्या नीचांकाला, तर निर्यात कार्यादेश, विक्रीतील वाढीने जानेवारीपासूनचा नीचांकी नोंदविल्याचे दिसून आले आहे.
देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या आणि क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया’द्वारे पार पडणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित ‘पीएमआय निर्देशांक’ ऑगस्ट महिन्यासाठी ५७.५ गुणांवर राहिला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये तो ५८.१ असा नोंदला गेला होता. तथापि निर्देशांकाची दीर्घकालीन सरासरी ५४ गुणांची आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात या सरासरीपेक्षा निर्देशांकाची पातळी साडेतीन गुणांनी अधिक आहे. निर्देशांक ५० गुणांवर असल्यास विस्तार आणि ५० गुणांच्या खाली असल्यास त्यात घसरण झाल्याचे मानले जाते.
आणखी वाचा-RBI चे नवे फीचर! आता डेबिट कार्डशिवायही एटीएममध्ये जमा करा पैसे; कसे वापरावे घ्या जाणून
सर्वेक्षणानुसार, चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत नवीन व्यवसायांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. असे असले तरी विस्ताराचा वेग सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. नवीन निर्यात कार्यादेशांमधील वाढीचा वेग जानेवारीपासूनचा सर्वांत कमी नोंदविला गेला आहे. काही कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याने रोजगारनिर्मितीतील वाढ चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत कमी झाली आहे. असे असले तरी सरासरी रोजगारनिर्मितीचा दर चांगला आहे.
कच्च्या मालाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याची बाब सकारात्मक ठरली आहे. यामुळे निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांकडून कच्च्या मालाची खरेदी वाढून त्यांनी पुरेसा साठा करण्यावर भर दिल्याचे दिसून आले आहे. याच वेळी उत्पादनांच्या किमतीतही किंचित घट झाली आहे. ही घट कमी असल्याने निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचा नफा वाढला आहे. आगामी काळातच स्पर्धात्मकता आणि महागाईची चिंता यामुळे निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावू शकतो, असे एचएसबीसी इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले.
आणखी वाचा-Gold Silver Price : पोळ्याच्या दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या, आजचे नवे दर
भारतीय निर्मिती क्षेत्राचा ऑगस्टमध्ये विस्तार झाला असला तरी, हा विस्ताराचा वेग मंदावला आहे. नवीन कार्यादेश आणि उत्पादनातील वाढही कमी झाली आहे. वाढलेली स्पर्धात्मकता यासाठी कारणीभूत ठरली आहे. -प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया