वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशात यंदा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल, असे पूर्वानुमान आहे. यामुळे खाद्यवस्तूंची महागाई आगामी काळात कमी होईल, असा अंदाज केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या मार्चच्या आर्थिक टिपणाने गुरुवारी वर्तवला.

भारतीय हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त मोसमी पाऊल यंदा पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे कृषी उत्पादनात वाढ होणार असल्याने खाद्यवस्तूंची महागाई कमी होईल. किरकोळ महागाई दरात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये मोठी घट नोंदविण्यात आली असून, करोना संकटानंतरची नीचांकी पातळी त्याने गाठली आहे. याच वेळी खाद्यवस्तूंचा महागाई दर मार्चमध्ये ८.५ टक्क्यांवर आला आहे. त्याआधीच्या फेब्रुवारी महिन्यात तो ८.७ टक्के होता, असे टिपणाने नमूद केले आहे.

हेही वाचा >>>कोटक महिंद्र बँकेवर निर्बंध; ऑनलाईन ग्राहक नोंदणी व क्रेडिट कार्ड वितरणावर रिझर्व्ह बँकेची बंदी

आगामी काळात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढणार असून व्यापारी तूट कमी होणार आहे. यामुळे रुपयाच्या मूल्यात घसरण होणार नाही. जागतिक पातळीवर आव्हाने असली तरी भारताची आर्थिक कामगिरी चांगली राहील. सर्वच क्षेत्रात वाढ होणार असल्याने अर्थव्यवस्थेचा विस्तार होईल. याचबरोबर जागतिक वाढीलाही भारत गती देईल, असे अहवालात नमूद कऱण्यात आले आहे.

भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम राखणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आंतरराष्ट्रीय संस्था आणि रिझर्व्ह बँकेने सकारात्मक अनुमान वर्तविले आहे.- केंद्रीय अर्थ मंत्रालये