आर्थिक नियोजनाच्या मदतीने प्रगती करायची असेल तर आर्थिक नियोजनांत संरक्षक योजना, बचत आणि गुंतवणूक यांचा समावेश केला पाहिजे. मागील लेखात आपण संरक्षक योजनेतील आरोग्य विमा याबद्दल माहिती घेतली. या लेखात आपण जीवन विमा याबाबत माहिती घेऊया. जीवन विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजारपणामुळे/अपघातामुळे घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्यांचे भावनिक आणि आर्थिक असे दुहेरी नुकसान होते. जर कर्त्या व्यक्तीचा योग्य रकमेचा जीवन विमा असेल तर आर्थिक नुकसानाची तीव्रता कमी करणे शक्य होते.
उदाहरणाच्या मदतीने आपण हे समजून घेऊया. राकेश आणि त्याची पत्नी स्मिता यांच्या कारचा अपघात झाला आणि दुर्दैवाने राकेशचा त्यात वयाच्या केवळ ४३ व्या वर्षी मृत्यू झाला. ३९ वर्षीय स्मिता पूर्णवेळ गृहिणी असल्यामुळे तिला अर्थार्जनाचे कोणतेही साधन नव्हते आणि दोन मुलांचे शिक्षण, गृह कर्ज फेडणे, घरखर्च चालवणे, मुलांची लग्न अशा विविध आर्थिक जबाबदाऱ्या तिच्यावर आल्या. सुदैवाने राकेशने योग्य आर्थिक नियोजन केलेले असल्यामुळे त्याने १.७ कोटींचा मुदतीचा विमा घेतलेला होता. या विम्याच्या रकमेतून ४७ लाखांचे गृहकर्ज फेडल्यावरसुद्धा स्मिताकडे १.२३ कोटी शिल्लक राहिले. या १.२३ कोटींच्या मदतीने स्मिताला घरखर्च, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न इत्यादी आर्थिक उद्दिष्टं पूर्ण करणे शक्य झाले.
प्रत्यक्षात समाजात मात्र असे दिसून येते की, योग्य माहिती अभावी, तसेच आर्थिक नियोजनांत प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे महत्त्व न समजल्याने अनेक जण योग्य रकमेचा जीवन विमा घेत नाहीत. अशा व्यक्तींचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर कुटुंबाचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते आणि त्यांना विविध आर्थिक उद्दिष्टं साध्य करण्यास अनेक अडचणी येतात. या अशा अडचणी आपल्यापश्चात आपल्या कुटुंबीयांना येऊ नये याकरिता घरातील कर्त्या व्यक्तीने शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाच योग्य रकमेचा जीवन विमा घ्यावा. जीवन विम्याबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे
१) कुटुंबातील कर्त्या व्यक्तीसाठी आपल्या जीवनशैलीनुसार विमा संरक्षण घ्यावे.
२) जीवन विमा संरक्षण किती रकमेचे घ्यावे? कर्त्या व्यक्तीच्या पश्चात अन्य सदस्यांची सर्व आर्थिक उद्दिष्टं योग्यप्रकारे पूर्ण करता येतील इतक्या रकमेचे जीवन विमा संरक्षण घ्यावे. जीवन विम्याची रक्कम निश्चित करण्यासाठी तुम्ही आर्थिक नियोजनकार अथवा विमा विक्रेते यांची सेवा घेऊ शकता.
३) किमान किती रकमेचे विमा संरक्षण असावे – गृहकर्जासह इतर काही कर्ज असतील तर ती एकरकमी परत करता येईल आणि कुटुंबातील इतर सदस्य कमावते होतील तोपर्यंत तरी घरखर्च चालवता येईल किमान इतक्या रकमेचे जीवन विमा स्वरक्षण घ्यावे.
४) जीवन विम्याची रक्कम निश्चित करण्याचे सोपे सूत्र – कर्त्या व्यक्तीने वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० पट विमा संरक्षण घ्यावे. उदाहरणार्थ, व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न १० लाख असेल तर त्याने किमान १ कोटीचे विमा संरक्षण घ्यावे.
५) जीवन विम्याचा कालावधी किती असावा? प्रत्येक कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने याबाबत विमा सल्लागाराशी चर्चा करून कालावधी निश्चित करावा. कर्त्या व्यक्तीच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण होईपर्यंत विमा संरक्षण सुरू असावे. एका प्रातिनिधिक उदाहरणाच्या मदतीने आपण हे जाणून घेऊया. ३७ वर्षीय सुनीलने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या वयाच्या ५२-५५ पर्यंत मुलीचे शिक्षण आणि लग्न या जबाबदाऱ्या पूर्ण होतील आणि त्याच्या वयाच्या ५८ व्या वर्षी ४.५ कोटींचा सेवानिवृत्ती निधी त्याच्याकडे असेल. अर्थातच सुनीलने त्याच्या वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत जीवन विमा संरक्षण घेणे योग्य ठरेल.
६) मुदतीचा विमा – मुदतीचा विमा तुम्हाला किमान प्रीमियममध्ये जास्तीत जास्त विमा संरक्षण देतो. उदाहरणार्थ, ३९ वर्षीय मंदारने १ कोटींचा २० वर्ष मुदतीचा विमा घेतला तर वार्षिक केवळ ३३, ४७८ रुपये प्रीमियम असेल.
७) प्रशिक्षण – स्वतः जीवन विम्याबद्दल माहिती घेऊन आपल्या घरातील सदस्य, नातेवाईक, आपले मित्र यांच्यासह घरात काम करणाऱ्या व्यक्ती यांनासुद्धा माहिती देऊन आपण देशातील आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी मदत करू शकतो.
८) १२ रुपयांत २ लाखाचे अपघाती विमा संरक्षण – प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेच्या मदतीने दरवर्षी केवळ १२ रुपये प्रीमियम देऊन २ लाखाचे अपघाती विमा संरक्षण मिळवता येते. जर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर वारसास २ लाख रुपये देण्यात येतात.
हेही वाचा – नवीन करनिर्धारण वर्ष : गुंतवणूक आणि कर नियोजनांत कोणते बदल आवश्यक?
९) ३३० रुपयात २ लाखांचे विमा संरक्षण – प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेच्या मदतीने केवळ ३३० रुपये प्रीमियम देऊन २ लाखांचे विमा संरक्षण मिळविता येते.
१० ) तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा – जीवन विमा संरक्षण घेण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या. महत्त्वाचे – आर्थिक नियोजनामध्ये जीवन विमा अत्यंत महत्त्वाचा आहे, तज्ज्ञाच्या मदतीने जीवन विम्याचा समावेश आपल्या आर्थिक नियोजनांत नक्की करावा.
– देवदत्त धनोकर
लेखक पुणेस्थित गुंतवणूक सल्लागार
(dgdinvestment@gmail.com)