Market Week Ahead: महागाईवर नियंत्रणासह, अर्थव्यवस्थेच्या वाढीला पाठबळ म्हणून रिझर्व्ह बँकेने सरलेल्या सप्ताहाअखेरीस तब्बल पाच वर्षानंतर पहिल्यांदा व्याजदरात पाव टक्क्यांच्या कपातीचा दिलासादायी निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी त्यांच्या द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेतला. महागाई दर लक्ष्यित पातळीपर्यंत आणण्यावर लक्ष केंद्रीत करतानाच, ७ टक्क्यांचा विकासदर भारताची अर्थव्यवस्था आगामी आर्थिक वर्षात निश्चितच गाठू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तथापि त्यांचे हे आश्वासक विधान आणि अपेक्षेप्रमाणे झालेली व्याजदर कपात शेअर बाजाराला तेजीचे वळण देण्यास फोल ठरली. सप्ताहसांगतेच्या शुक्रवारच्या (७ फेब्रुवारी) शेअर बाजारातील व्यवहारात निराशा आणि नफावसुलीने सेन्सेक्स १९८ अंशांच्या घसरणीने ७७,८६० पातळीवर बंद झाला. येत्या आठवड्यात बाजारात या संबंधाने काही प्रतिक्रिया उमटते का ते पाहावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

·      साप्ताहिक आधारावर, सेन्सेक्स ३५४ अंशांनी आणि निफ्टी निर्देशांक ७७.८ अंशांनी वधारला.

·      सलग चार सप्ताहातील घसरणीनंतर शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी केलेली ही साप्ताहिक कमाई ठरली.

·      सोन्याने प्रथमच तोळ्यामागे ८६ हजार रुपयांची पातळी ओलांडली

·      रुपयाने प्रति डॉलर या आठवड्यात ८७.५९ या नवीन सार्वकालिक नीचांकापर्यंत लोळण दाखविली.

·      भारताचा परकीय चलन साठा ३१ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात १.०५ अब्ज डॉलरने वाढून ६३०.६०७ अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केले.

आता १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या आठवड्याचा शेअर बाजाराचा कल कसा राहिल याचा वेध घेऊ.

आगामी आठवड्यातील पाच लक्षणीय घडामोडी

१. महागाई दर, औद्योगिक उत्पादन दराचे आकडे:

आर्थिक मंदावलेपणाच्या सुरु असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या कारखानदारी क्षेत्राचे आरोग्यमान दर्शविणारी अधिकृत आकडेवारी म्हणजेच डिसेंबर २०२४ मधील औद्योगिक उत्पादन निर्देशांकांचा (आयआयपी) स्तर बुधवारी (१२ फेब्रुवारी) जाहीर होईल. अधिक महत्त्वाचे म्हणजे त्याच दिवशी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारीत किरकोळ महागाई दराची जानेवारी २०२५ साठी आकडेवारी पुढे येईल. नोव्हेंबरमधील ५.३८ टक्क्यांच्या तुलनेत किरकोळ महागाई दर सरलेल्या डिसेंबरमध्ये ५.२२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या अनुमानाप्रमाणे महागाईचा ताप कमी झाला अथवा नाही, हे जानेवारीच्या आकड्यांतून स्पष्ट होईल.

त्यानंतर शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) भारतातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत घाऊक महागाई दराची आकडेवारी येईल. आधीच्या डिसेंबर महिन्यांत त्या वाढ होऊन त्याने २.३७ टक्क्यांची पातळी गाठली आहे. त्यामुळे जानेवारीतही ही चढती भाजणी कायम राहिल काय, याबाबत औत्सुक्य आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वर्तमान स्थितीबद्दल अधिक चांगले संकेत म्हणून गुंतवणूकदारांना या आकड्यांचा वेध घेता येईल.

२. अमेरिकेतील महागाई, फेडरल रिझर्व्हची साक्ष:

डिसेंबर २०२४ मध्ये अमेरिकेत सलग तिसऱ्या महिन्यात वार्षिक तुलनेत महागाई दर वाढत आल्यानंतर, आता जानेवारी २०२५ ची आकडेवारी बुधवारी (१२ फेब्रुवारी) जाहीर होऊ घातली आहे. नवीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचा अंमल सुरू झाल्यानंतरची ही महागाईसंबंधाने त्यांचीही पहिलीच कसोटी असेल, शिवाय अमेरिकेतील व्याजदर कपातींचे भवितव्यही त्यावरूनच निर्धारीत होईल. त्याचप्रमाणे अमेरिकेतील कायदेमंडळापुढे तेथील मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांची त्याच दिवशी साक्ष नियोजित आहे, त्या प्रसंगी त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टिप्पण्यांवर अमेरिकी बाजारातील नव्हे, तर जगभरातील गुंतवणूकदारांचे देखील बारीक लक्ष असेल.

३. ‘ओपेक’ मासिक अहवाल:

खनिज तेल निर्यातदार देशांची संघटना – ‘ओपेक’कडून मासिक तेल बाजार अहवाल बुधवारी (१२ फेब्रुवारी) जारी केला जाईल. डोकेदुखी ठरलेल्या भू-राजकीय तणावांच्या पार्श्वभूमीवर, मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीबद्दल तेल निर्यातदारांचे विचार आणि मनसुबे यातून स्पष्ट होतील. जगातील एक मोठा तेल आयातदार देश म्हणून भारतीय अर्थव्यवस्था आणि पर्यायाने भारतीय गुंतवणूकदारांच्या दृष्टीनेही ही जिव्हाळ्याची बाब ठरेल.

४. भारतीय आयात-निर्यात आकडेः

वेगाने सुरू असलेल्या घडामोडीत बाह्य परिस्थिती उत्तरोत्तर व्यापाराच्या दृष्टीने  प्रतिकूल बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या सरलेल्या जानेवारी महिन्यांतील निर्यात आणि आयात स्थितीचे नोंदवले गेलेले आकडे शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) जाहीर केले जातील. त्याचदिवशी रिझर्व्ह बँकेकडून ३१ जानेवारी रोजी संपलेल्या पंधरवड्यासाठी देशातील बँकांचा कर्ज पुरवठा आणि ठेवींच्या स्थितीबाबतचा अहवालही स्वतंत्रपणे जारी करेल.

५. कंपन्यांचे तिमाही निकालः

आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या (ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४) तिमाहीच्या निकालांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, आगामी आठवड्यात अनेक बड्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरी गुंतवणूकदारांकडून बारकाईने तपासली जाईल. या कंपन्यां अशा-

सोमवार (१० फेब्रुवारी) – अपोलो हॉस्पिटल्स, बाटा इंडिया, क्रिसिल, आयशर मोटर्स, एस्कॉर्ट्स कुबोटा, जिलेट इंडिया, ग्रासिम इंडस्ट्रीज, इंडिगो पेंट्स, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स, पतंजली फूड्स;

मंगळवार (११ फेब्रुवारी) – ल्युपिन, बर्जर पेंट्स, ईआयएच, व्होडाफोन आयडिया, आयआरसीटीसी;

बुधवार (१२ फेब्रुवारी) – अशोक लेलँड, भारत फोर्ज, गोदरेज इंडस्ट्रीज, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, विजया डायग्नोस्टिक सेंटर;

गुरुवार (१३ फेब्रुवारी) – हिंडाल्को इंडस्ट्रीज, इप्का लॅबोरेटरीज, युनायटेड ब्रुअरीज, हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायझेस;

शुक्रवार (१४ फेब्रुवारी) – ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स. निकाल अपेक्षेनुरूप नसले तर त्याचे बाजारात खूपच तिखट प्रतिसाद उमटतात, हे गेल्या महिन्याभरात दणकून आपटलेले शेअर्सचे भाव आणि एकूण शेअर बाजाराचा कलही दाखवून देतच आहे. त्या उलट चांगल्या निकालांचे बाजारात स्वागतही होत आहे, पण त्यांची संख्या तुलनेने कमीच आहे.  

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five developments in the stock market in the week after rbi interest rate cut print eco news amy