लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी मुंबई : सौर विजेसाठी सोलर पीव्ही मॉड्यूल निर्माता गणेश ग्रीन भारत लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) १२५.२३ कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. कंपनीची भागविक्री शुक्रवार, ५ जुलैला खुली होऊन ९ जुलैला बंद होईल. त्यासाठी प्रति समभाग १८१ रुपये ते १९० रुपये किंमत निश्चित करण्यात आली असून, विक्रीपश्चात समभाग ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचिबद्ध होतील. या भागविक्रीचे व्यवस्थापन हेम सिक्युरिटीजकडून पाहिले जात आहे. कंपनीची सौर पीव्ही उत्पादनक्षमता २३६.७३ मेगावॉट आहे आणि प्रस्तावित विस्तार योजनेत त्यात १६३.२७ मेगावॉट क्षमतेची भर पडले. गणेश ग्रीनची सहयोगी कंपनी सौरज एनर्जीदेखील १९२.७२ मेगावॉट स्थापित क्षमतेसह सौर पीव्ही मॉड्यूल्सच्या निर्मिती करते. भागविक्रीतून उभारला जाणारा निधी कर्जाची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी, प्रकल्पात नवीन यंत्रसामग्रीला वित्तपुरवठ्यासाठी, खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल. हेही वाचा >>>फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंडात ८ जुलैपासून गुंतवणूक कंपनीने सौभाग्य योजना, कुसुम योजना आणि सौर सुजला योजना यांसारख्या विविध आठ राज्यांतील सरकारी योजनांतर्गत प्रकल्प पूर्ण केले आहेत. याशिवाय, कंपनी हर घर जल (जल जीवन मिशन) सारख्या पाणीपुरवठा योजनांची रचना, बांधकाम, स्थापना, संचालन आणि देखभाल यातदेखील गुंतलेली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत गणेश ग्रीन भारतचा महसूल १७०.१७ कोटी रुपये आणि निव्वळ नफा १९.८८ कोटी रुपये होता.