scorecardresearch

नोकरकपातीची साथ भारतातही! मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या ‘गिटहब’कडून १४२ अभियंत्यांना नारळ

भारतातील १८० कर्मचाऱ्यांना ‘गिटहब’ने कमी केले आहे. यात अभियांत्रिकी विभागातील १४२ आणि कार्यक्रम व उत्पादन विभागातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

GitHub fires employees
नोकरकपातीची साथ भारतातही! मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या ‘गिटहब’कडून १४२ अभियंत्यांना नारळ (image – indian express)

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या ‘गिटहब’ या तंत्रज्ञानाधारित सेवा क्षेत्रातील कंपनीने भारतातील १८० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. अभियांत्रिकी विभागातील १४२ अभियंत्यांचा यात समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील १८० कर्मचाऱ्यांना ‘गिटहब’ने कमी केले आहे. यात अभियांत्रिकी विभागातील १४२ आणि कार्यक्रम व उत्पादन विभागातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. करोना संकटानंतर कंपन्यांच्या नवीन कामाच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे अनेक बड्या तंत्रज्ञान कंपन्यांकडून खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नारळ दिला जात आहे.

हेही वाचा – पीएफ व्याजदर वाढून ८.१५ टक्क्यांवर, देशभरातील सुमारे सहा कोटी कर्मचाऱ्यांना फायदा

मायक्रोसॉफ्टने २०१८ मध्ये ओपन सोर्स डेव्हलपर व्यासपीठ असलेल्या ‘गिटहब’ची सुमारे ७५० कोटी डॉलरला खरेदी केली होती. त्यावेळी देशभरात कंपनीच्या व्यासपीठावर २.८ कोटी डेव्हलपर कार्यरत होते. आता ही संख्या १० कोटींहून अधिक झाली आहे. कपात झालेल्या कर्मचाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, कंपनीच्या बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्लीतील कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. विक्री आणि विपणन या दोनच विभागांतील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आलेली नाही. कंपनीने कर्मचाऱ्यांशी २७ मार्चला संपर्क साधून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राजीनामा देण्यास सांगितले होते.

हेही वाचा – ‘पॅन’ संलग्नतेला मुदतवाढीचा ‘आधार’

कंपनीने कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतन दिले गेले आहे. याचबरोबर कर्मचाऱ्यांचा अनुभव आणि गिटहबमधील सेवेचा कालावधी या आधारावर भरपाई दिली आहे. कंपनीने २७ मार्चला सायंकाळी ५ वाजेपर्यंत राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच ही सुविधा देण्याची अट घातली होती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 10:49 IST

संबंधित बातम्या