एपी, फ्रँकफर्ट (जर्मनी) : जगभरातील अकरा मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांनी मंगळवारी अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांची एकमुखी पाठराखण केली. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सुरू असलेल्या संघर्षात, फेडचे स्वातंत्र्य जपण्यासाठी त्यांनी बांधिलकी व्यक्त केली.
ट्रम्प यांनी न्याय विभागामार्फत चौकशी करून आणि फौजदारी खटल्यांची धमकी देऊन फेडविरूद्ध संघर्ष नाट्यमयरित्या वाढवल्यानंतर जगभरातून त्यावर उमटलेली ही प्रतिक्रिया आहे. युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या (ईसीबी) अध्यक्षा क्रिस्टीन लागार्ड आणि बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर अँड्र्यू बेली यांच्यासह या अकरा जणांनी पॉवेल यांच्या बाजून संयुक्त निवेदन जारी करताना मध्यवर्ती बँकेच्या स्वायत्तता जपण्यालाही अधोरेखित केले.
पॉवेल यांनी प्रामाणिकपणे सेवा करताना त्यांच्या कार्यकक्षेवर लक्ष केंद्रित केले आणि सार्वजनिक हितासाठी वचनबद्धता दर्शविली आहे. मध्यवर्ती बँकांचे स्वातंत्र्य हे नागरिकांच्या हितासाठी वित्तीय आणि आर्थिक स्थिरतेचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे कायद्याचे राज्य आणि लोकशाही उत्तरदायित्वाचा पूर्ण आदर राखून ते स्वातंत्र्य जपणे महत्त्वाचे आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
रविवारी एका निवेदनात, ट्रम्प यांच्या सततच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रघात सोडून, पॉवेल यांनी प्रशासनाच्या फौजदारी खटल्यांच्या धमकीला उत्तर दिले आणि ट्रम्प यांचे हे प्रयत्न अमेरिकेच्या व्याजदर धोरणावर नियंत्रण मिळवण्याच्या मोहिमेतून सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी व्याजदर कमी करण्यासाठी वेगाने पावले न उचलल्याबद्दल पॉवेल आणि फेडवर वारंवार टीका केली आहे. प्रमुख अर्थतज्ज्ञांनीही सध्याच्या घडामोडीवर भाष्य करताना, ट्रम्प यांच्या मागण्यांपुढे झुकणारी राजकीयदृष्ट्या प्रभावित ‘फेड’ ही महागाई नियंत्रक म्हणून आपली विश्वासार्हता गमावेल, असा इशारा दिला आहे.
या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर एरिक थेडीन; डेन्मार्कच्या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ख्रिश्चन केटेल थॉमसन; स्विस नॅशनल बँकेचे अध्यक्ष मार्टिन श्लेगल; रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नर मिशेल बुलॉक; बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर टिफ मॅकलेम; बँक ऑफ कोरियाचे गव्हर्नर चांग योंग री; ब्राझीलच्या मध्यवर्ती बँके चे गव्हर्नर गॅब्रिएल गॅलिपोल; बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सचे बोर्ड अध्यक्ष फ्रँकोइस विलेरॉय डी गॅलहाऊ आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सचे महाव्यवस्थापक पाब्लो हर्नांडेझ डी कोस यांचा समावेश आहे.
