मुंबई: गोदरेज समूहातील वित्तीय सेवा क्षेत्रातील अंग असलेल्या गोदरेज कॅपिटलने जागतिक कंपनी ‘सेल्सफोर्स’च्या कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानसमर्थ ग्राहक संपर्क व्यवस्थापन (सीआरएम) व्यासपीठाचा वापर सुरू करत असल्याची शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली.
उभयतांमधील या सहकार्यातून गोदरेज कॅपिटलच्या उपकंपन्यांना डिजिटल कर्ज व्यवहाराची प्रक्रिया गतिमान करणारे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासह आणि ग्राहकांचा सेवा अनुभवही गुणात्मक बनेल, असे गोदरेज कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी मनीष शहा म्हणाले. याप्रसंगी सेल्सफोर्सच्या दक्षिण आशियाच्या अध्यक्षा आणि मुख्याधिकारी अरुंधती भट्टाचार्य आणि सहयोगी भागीदार डेलॉइट इंडियाचे अश्विन बल्लाळ उपस्थित होते.
कर्जइच्छुक नवीन ग्राहकांचा शोध व निश्चिती ते कर्जासाठी अर्जापासून ते प्रत्यक्ष कर्ज वितरणापर्यंत संपूर्ण प्रक्रिया यातून अधिक गतिमान, वैयक्तिकीकृत आणि सोपी होईल. यामुळे निर्णय घेण्यासाठी लागणारा वेळ अल्पतम राखण्यासह, पत-मूल्यांकनात अचूकता येईल आणि देशभरातील ग्राहक आणि उद्योगांसाठी कर्ज सेवा अधिक मजबूत होईल, असा शहा यांनी व्यक्त केला.
गोदरेज कॅपिटल व्यवसायाचा विस्तार करत असून, भविष्यासाठी उपयुक्त नव-तंत्रज्ञानामध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे. कंपनीचा अंतर्गत संघ विविध विभागांमध्ये उपयोजित एआय आधारित उपाययोजना विकसित करत आहे, जे कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदतकारक ठरत आहे. सेल्सफोर्सशी भागीदारीसाठी झालेली गुंतवणूक आणि त्यायोगे व्यवसायवाढीची अपेक्षित उद्दिष्टे यावर मात्र शहा यांनी भाष्य करण्याचे टाळले.