जळगाव – शहरातील सराफ बाजारात सोमवारी १८५४ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९८ हजार ६७३ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मंगळवारी दिवसभरात १४४३ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचा दर एक लाख ११६ रुपयांपर्यंत गेला. अक्षय्य तृतीयेनंतर खालावलेले सोन्याचे दर पुन्हा एक लाखावर गेल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे.
सराफ बाजारात मंगळवारी दुपारपर्यंत १२३६ रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर एक लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. त्यात सायंकाळी पुन्हा २०७ रुपयांची वाढ झाल्याने दर एक लाखांवर गेले. सोन्याचे दर कमी होण्याची आशा बाळगून असलेल्या ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांची त्यामुळे मोठी निराशा झाली. अलीकडच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार अनुभवण्यास मिळाले आहेत. त्यानुसार, मंगळवारी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून, बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चांदीच्या दरातही २०६० रुपये वाढ
जळगावमध्ये शनिवारी २०६० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत घसरले होते. सोमवारी दिवसभरात कोणतीही वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याने चांदीचे दर स्थिरच राहिले. त्यामुळे ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला होता. मात्र, मंगळवारी दिवसभरात २०६० रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदी प्रतिकिलो ९९ हजार ९१० रुपयांपर्यंत पोहोचली.