पीटीआय, नवी दिल्ली
विमा उत्पादनांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) शून्यावर आणली जाणे आयुर्विमा उद्योगाच्या पथ्यावर पडली असून, सलग दुसऱ्या महिन्यात या क्षेत्राने हप्ते उत्पन्नांत दुहेरी अंकातील वाढ कायम ठेवली आहे. सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात आयुर्विमा कंपन्यांना पहिल्या हप्त्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात १२.१ टक्क्यांची वाढ होऊन, तो ३४,००७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, अशी माहिती ‘केअरएज रेटिंग्ज’ने विमा नियामक ‘इर्डा’च्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे.

ऑक्टोबर २०२५ मध्ये, आयुर्विमा कंपन्यांनी विमा हत्यापोटी ३४,००७ कोटी मिळविले आहेत, जे ऑक्टोबर २०२४ मधील ३०,३४८ कोटी रुपयांपेक्षा १२.१ टक्के अधिक आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये आयुर्विमा उद्योगाला मिळणाऱ्या पहिल्या हप्त्यापोटीचे उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढून ४०,२०७ कोटी रुपयांवर पोहोचले होते. केअरएज रेटिंग्जचे वरिष्ठ संचालक संजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, सरकारी मालकीची विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने आघाडीचे स्थान कायम ठेवले आहे, तर खासगी विमा कंपन्यांनीही दुहेरी अंकातील वाढ साध्य केली आहे.

एलआयसीला विम्याच्या पहिल्या हप्त्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नांत १३ टक्के वाढ झाली असून, ते १९,२७४ कोटी रुपयांवर गेले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत आयुर्विमा उद्योगाच्या पहिल्या हप्त्यापोटीच्या उत्पन्नात ८ टक्के वाढ झाली असून ते एकत्रित २.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याच कालावधीत एलआयसीचे हप्ते उत्पन्न ६ टक्के वाढीसह, १,४०,२८२ कोटी रुपये झाले आहे.

ऑक्टोबरमध्ये पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नात काही विमा कंपन्यांनी घटही नोंदविली आहे, ज्यात इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स १९८ कोटी रुपये (-२२ टक्के), कोटक महिंद्र लाइफ इन्शुरन्स ६४७ कोटी रुपये (-११ टक्के) आणि पीएनबी मेटलाइफ इन्शुरन्स ५१३ कोटी रुपये (-४ टक्के) यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने विमा हप्त्यांवर आकारला जाणारा १८ टक्के जीएसटी थेट शून्यावर आणला आहे. आरोग्य विमा, आयुर्विमा आणि पुनर्विम्यावरील जीएसटी २२ सप्टेंबर २०२५ पासून पूर्णपणे माफ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ऑगस्टमध्ये नवीन विम्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात ५.२ टक्क्यांनी घट झाली होती. करमाफीच्या प्रतीक्षेच्या परिणामी ही घट झाली. वैयक्तिक आयुर्विमा उत्पादनांवरील जीएसटीमध्ये अलिकडेच कपात केली गेल्याने विमा कंपन्यांना वाढीचा वेग टिकवून ठेवण्यास मदत झाली.