सॅनफ्रान्सिस्को : तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी गूगलकडून आणखी कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. मनुष्यबळाची पुनर्रचना करण्याच्या हेतूने कंपनीने हे पाऊल उचलले आहे. गूगल फायनान्स आणि गृहनिर्माण विभागातील कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने कमी करण्यात आले आहे.

बिझनेस इनसायडरने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, गूगलने काही विभागांतील कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. याच वेळी काही व्यावसायिक विभागांचे स्थलांतर भारतासह इतर देशांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. गूगलचे वित्तीय प्रमुख रूथ पोरॅट यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे कळविले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मनुष्यबळ पुनर्रचनेचे पाऊल कंपनीने उचलले असून, त्याअंतर्गत बंगळूरु, मेक्सिको सिटी आणि डब्लिन येथील कार्यालयांचा विस्तार केला जाईल.

हेही वाचा >>> केकी मिस्त्री एचडीएफसी लाइफचे नवे अध्यक्ष; एचडीएफसी लाइफची धुरा केकी मिस्त्रींकडे

गूगलने कर्मचारी कपात केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, नेमकी किती कर्मचाऱ्यांची कपात केली हे जाहीर केलेले नाही. कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कंपनीच्या सर्व विभागांमध्ये ही कपात झालेली नाही. त्यामुळे कपात करण्यात आलेले कर्मचारी दुसऱ्या विभागात अर्ज करू शकतात.

गूगल कंपनी मनुष्यबळाची रचना अतिशय सुटसुटीत करीत आहे. त्यातून कर्मचाऱ्यांना कंपनीसाठी अधिक नावीन्यपूर्ण आणि प्राधान्यक्रमावर असलेल्या गोष्टींवर काम करता येईल. – प्रवक्ता, गूगल