ठाणेः बहुराज्यांत विस्तार असलेल्या जीपी पारसिक सहकारी बँकेने ६,५८५ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय, ५२.५५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा सरलेल्या २०२३-२४ आर्थिक वर्षात कमावला असून, नक्त अनुत्पादित कर्जाचे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के पातळीवर राखण्यात पुन्हा यश मिळविल्याचे बँकेचे अध्यक्ष विक्रम गोपीनाथ पाटील यांनी सांगितले. अलीकडेच काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे पार पडलेल्या बँकेच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी बँकेने केलेल्या प्रगतीची उपस्थित सभासदांना माहिती दिली.

जीपी पारसिक बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश नकुल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. डी. पै आणि बँकेचे संचालक मंडळ सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होते. बँकेने १५ जुलै २०२४ पासून सर्व शाखांमध्ये टीसीएसद्वारे विकसित नवीन कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित केली असून, याबद्दल सहकार्यासाठी अध्यक्ष पाटील यांनी भागधारक, खातेदार, ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांबद्दल आभार व्यक्त केले.

हेही वाचा >>> सोन्या चांदीच्या पावलांनी गौरी आली दारी, करा सोन्याची खरेदी!गौरी आगमनाच्या दिवशी जाणून घ्या सोने चांदीचे दर

पुणे पीपल्स बँकेचा १२.५ टक्के लाभांश

पुणेः बहुराज्यात विस्तारलेल्या पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण व्यवसायाचा २,३७८ कोटींचा टप्पा पार केला असून, १६.२० कोटींचा निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे यांनी दिली.

बँकेची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (८ सप्टेंबर) सकाळी येथील दि पुना मर्चंटस् चेंबर, व्यापार भवन सभागृहात रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेचे औचित्य साधून, संचालक मंडळाच्या शिफारशीनुरूप अहवाल वर्षासाठी १२.५० टक्के दराने लाभांश जाहीर करण्यात आला. लाभांशाची रक्कम लवकरच संबंधित सभासदांच्या खात्यावर जमा होईल, असे रणदिवे यांनी स्पष्ट केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोंडवे यांनी सभेचे संचालन केले, प्रास्ताविक व सभासदांनी विचारलेल्या शंकाचे निरसन अध्यक्ष रणदिवे यांनी केले. बँकेचे जेष्ठ संचालक ॲड. सुभाष मोहिते यांनी सभेस मार्गदर्शन केले व उपस्थितांचे आभार मानले. रिझर्व्ह बँकेने नुकतीच बँकेला बारामती व वाळुंज (छत्रपती संभाजीनगर) येथे शाखा उघडण्यास मान्यता दिली आहे.