लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी मुंबई : सरलेल्या जुलै महिन्यात वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी संकलन वार्षिक तुलनेत १०.३ टक्क्यांनी वाढून १.८२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. आणखी वाचा-इन्फोसिसला ३२,००० कोटी ‘जीएसटी’ भरण्याची नोटीस, जुलै २०१७ ते २०२२ कालावधीसाठी कर चुकवल्याचा आरोप सरकारने जुलैमध्ये १६,२३८ कोटी रुपयांचा एकूण परतावा दिला असून त्यानंतर निव्वळ वस्तू आणि सेवा कर संकलन १.६६ लाख कोटींहून अधिक राहिले आहे. निव्वळ संकलनही वार्षिक तुलनेत १४.४ टक्क्यांनी वाढले आहे. जुलैमध्ये देशांतर्गत क्रियाकलापांमधून एकूण महसूल ८.९ टक्क्यांनी वाढून १.३४ लाख कोटी रुपये झाला आहे. तर आयातीतील जीएसटी महसूल १४.२ टक्क्यांनी वाढून ४८,०३९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एप्रिल २०२४ मध्ये जीएसटीच्या माध्यमातून २.१० लाख कोटींची भर तिजोरीत पडली होती, जे आजवरचे सर्वोच्च मासिक संकलन आहे.