मुंबई : विशेष बांधकाम उपकरणांची उत्पादक कंपनी असलेल्या अपोलो टेक्नो इंडस्ट्रीज लिमिटेडची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) मंगळवार, २३ डिसेंबरपासून खुला झाला असून, तो २६ डिसेंबर रोजी बंद होईल. यातून कंपनीने ४७.९६ कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले असून, विक्रीपश्चात तिचे समभाग ‘बीएसई एसएमई’ मंचावर सूचीबद्ध केले जाणार आहेत.
अपोलो टेक्नो ही गुजरातस्थित कंपनी भारतभरातील आणि निर्यात बाजारपेठेतील विविध अंतिम-वापरकर्त्या उद्योगांच्या गरजा पूर्ण करते. आयपीओमधून मिळणारा निधी खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी कंपनीकडून वापरला जाईल. या भागविक्रीसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स ही कंपनी काम पाहात आहे. गुंतवणूकदारांना सहभागी होऊन समभागांसाठी बोली लावण्यासाठी कंपनीने प्रति समभाग १२३ रुपये ते १३० रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. हा एसएमई आयपीओ असल्याने गुंतवणूकदारांना किमान १,००० समभागांसाठी बोली लावणारा अर्ज करावा लागेल.
अपोलो टेक्नो इंडस्ट्रीज लिमिटेड ही विशेष बांधकाम उपकरणांची उत्पादक कंपनी आहे, जी बांधकाम उद्योगासाठी ट्रेंचलेस तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये हॉरिझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलिंग (एचडीडी) रिग्स, डायफ्राम ड्रिलिंग रिग्स, रोटरी ड्रिलिंग रिग्स आणि सुटे भाग यांचा समावेश आहे.
अपोलो टेक्नोचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ रश्मिकांत पटेल म्हणाले, अपोलो टेक्नो ही भारतातील एकमेव कंपनी आहे जी हॉरिझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलिंग (एचडीडी) उपकरणे आणि डायफ्राम वॉल ड्रिलिंग रिग्सच्या उत्पादन घेण्यास सक्षम आहे. शिवाय रोटरी ड्रिलिंग रिग्सच्या उत्पादकांपैकी ती एक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, भारताच्या वाढत्या पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मजबूत स्वदेशी उत्पादन क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, तसेच निवडक निर्यात बाजारपेठांमध्ये कंपनीने उपस्थिती वाढवली आहे. आयपीओमधून मिळणारा निधी आगामी वाढीच्या योजनांना चालना देईल. ज्यायोगे ड्रिलिंग उपकरण विभागामध्ये कंपनीचे स्थान आणखी मजबूत बनविले जाईल.
हॉरिझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलिंग रिग्स हे प्रामुख्याने गॅस पाइपलाइन, पाणीपुरवठा लाइन, सांडपाणी लाइन, ऑप्टिकल फायबर केबल्स आणि इलेक्ट्रिकल कंड्युइट्स यांसारख्या आवश्यक सुविधा स्थापित करण्याच्या कामात वापरात येतात, तर डायफ्राम आणि रोटरी ड्रिलिंग रिग्स जमिनीखाली खोल तळघर, भूमिगत मेट्रो आणि विमानतळ प्रकल्प, पूल आणि उंच इमारतींच्या पायाभरणीसाठी वापरले जातात.
