मुंबई : खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेची उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या गेल्या आठवड्यातील उमदी मागणी नोंदविलेल्या १२,५०० कोटी रुपयांच्या भागविक्रीच्या (आयपीओ) सफलतेनंतर, बुधवारी कंपनीचे समभाग बाजारात सूचिबद्ध झाले आणि भांडवली बाजारातील त्यांनी पहिले पाऊलही दमदारपणे टाकले. समभागाने पहिल्या दिवसअखेर १३ टक्क्यांची मूल्य वाढ साधली.
अलिकडच्या काळातील या सर्वात मोठ्या आयपीओने सुमारे ५५ पटीने अधिक समभागांसाठी मागणी नोंदविणारा प्रतिसाद देशी-विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळविला होता. प्रति समभाग ७०० ते ७४० रुपयांचा किंमतपट्टा कंपनीने आयपीओसाठी निश्चित केला होता. बुधवारी झालेल्या सूचिबद्धतेनंतर एचडीबी फायनान्शियलच्या समभागाने ८४९.८५ रुपयांच्या उच्चांकापर्यंत मजल मारली होती. नफावसुलीने बेजार भांडवली बाजाराचा नकारात्मक कल असताना, समभागाने दिवसअखेर ८३३.५५ रुपयांचा म्हणजे प्रति समभाग ९३.५५ रुपयांचा लाभ दाखविणारा बंद नोंदविला.
आयपीओद्वारे उभारलेल्या निधीतून कंपनी भविष्यातील भांडवली गरजांच्या पूर्ततेसोबत अतिरिक्त कर्ज वितरण आणि व्यवसाय विस्तार करणार आहे. रिझर्व्ह बँकेने मोठ्या बँकेतर वित्तीय कंपन्यांना तीन वर्षांत सूचिबद्ध करण्याचे बंधन ऑक्टोबर २०२२ मध्ये घातले होते. त्यानुसार, एचडीबी फायनान्शियलने समभागांच्या सूचिबद्धतेचे हे पाऊल उचलले.
मागील दोन वर्षे प्रारंभिक बाजारपेठे नवनव्या कंपन्यांच्या आयपीओने गदारोळ उडवून दिला आणि गुंतवणूकदारांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. चालू आर्थिक वर्षात हा प्रवाह काहीसा मंदावलेला दिसत असला तरी वर्षाच्या उर्वरित महिन्यांमध्ये १४३ कंपन्यांचे आयपीओ बाजाराला धडक देतील आणि साधारण २६ अब्ज अमेरिकी डॉलर इतका निधी त्यांच्याकडून उभारला जाईल, असे ‘प्राइम डेटाबेस’चा अंदाज आहे.