मुंबई: भारतीय भांडवल बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या समभाग विक्रीच्या जेमतेम सफलतेनंतर, मंगळवारी ‘ह्युंदाई मोटर इंडिया’च्या समभागांच्या विधिवत सूचिबद्धता ही गुंतवणूकदारांसाठी अपेक्षेनुरूप निराशादायी ठरली. पहिल्या दिवशी समभाग ७ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाला.
प्रवासी वाहनांच्या क्षेत्रातील दक्षिण कोरियाच्या ह्युंदाईच्या भारतातील या उपकंपनीच्या समभागांच्या सूचिबद्धतेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. कंपनीने गेल्या आठवड्यात भांडवली बाजारातून २७,८७० कोटी रुपयांची विक्रमी निधी उभारणी केली होती.
प्रारंभिक भागविक्रीतून प्रत्येकी १,९६० रुपये किमतीला हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला होता. मात्र मोठ्या फायद्यासह सूचिबद्धतेऐवजी समभागाने १.३२ टक्के घसरणीसह सुरुवात करीत निराशा केली. दिवसभरातील व्यवहारात या समभागाने १,८०७ रुपयांचा किमतीतील तळ गाठला. दिवस सरताना प्रति समभाग १४०.४० रुपयांच्या म्हणजेच ७.१९ टक्क्यांच्या घसरणीसह १,८१९.६० रुपये पातळीवर तो स्थिरावला. कंपनीच्या समभागाच्या मंगळवार बंद भावानुसार तिचे बाजार भांडवल राष्ट्रीय शेअर बाजारात १,४७,८४९ कोटी रुपयांवर आहे.
हेही वाचा >>> सेन्सेक्स ९३० अंशांच्या गटांगळीसह दोन महिन्यांच्या नीचांकी
देशातील आजवरची सर्वात मोठी प्रारंभिक समभाग विक्री योजणाऱ्या ह्युंदाई मोटर इंडियाच्या ‘आयपीओ’कडे छोट्या गुतंवणूकदारांनी पाठ फिरवली होती. भागविक्रीत वैयक्तिक किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव हिश्शात जेमतेम ५० टक्केच मागणी नोंदवणारे अर्ज येऊ शकले होते. ‘आयपीओ’च्या अखेरच्या दिवशी ह्युंदाई मोटर इंडियाच्या समभागांसाठी एकंदर दुप्पट भरणा झाला. मात्र पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा प्रतिसाद सोडता वैयक्तिक किरकोळ गुंतवणूकदार आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भरणा पूर्ण होऊ शकला नाही. आयपीओसाठी कंपनीने प्रति समभाग १,८६५ ते १९६० रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता.
देशांतर्गत भांडवली बाजारात याआधी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने आयपीओच्या माध्यमातून २१,००० कोटी रुपये तर डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ने भांडवली बाजारातून १८,३०० कोटी रुपयांची मोठी निधी उभारणी आजवर ह्युंदाई पाठोपाठ केलेली आहे.