पीटीआय, नवी दिल्ली : चालू २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी भारताच्या ‘सकल देशांतर्गत उत्पादन’ (जीडीपी) वाढीचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात ‘आयएमएफ’ने पूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा ०.७ टक्क्यांनी वाढवून ७.३ टक्क्यांवर नेणारा सुधारित अंदाज सोमवारी व्यक्त केला. मात्र नंतरच्या दोन वर्षांत हा विकासदर भारताला कायम राखता येणार नसल्याचे भाकीतही तिने वर्तविले. २०२६ आणि २०२७ या दोन्ही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ६.४ टक्के दराने वाढेल, असा तिचा ताजा अंदाज आहे.
वॉशिंग्टनस्थित या जागतिक संस्थेने १ एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी आणि नंतरच्या २०२७-२८ अशा आगामी दोन वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावून ६.४ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असे ‘जागतिक आर्थिक दृष्टिकोन’ नामक अवलोकनांत म्हटले आहे. ‘जीडीपी’ वाढीचा हा अंदाज तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये व्यक्त केलेल्या ६.२ टक्क्यांपेक्षा जास्त असला तरी चालू वर्षासाठी अंदाजलेला ७.३ टक्क्यांचा विकास दर यापुढे टिकवता येणार नसल्याचे तिने म्हटले आहे.
जागतिक वाढीचा वेग मंदावण्याची चिन्हे
‘आयएमएफ’च्या अहवालानुसार, जागतिक वाढीचा वेगही मंदावण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत भारत पुढील दोन वर्षांत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम ठेवू शकणार आहे. आगामी दोन वर्षांतील भारताची ६.४ टक्के दराने वाढ ही जागतिक आणि प्रगत अर्थव्यवस्थांच्या सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असेल.
जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर २०२६ मध्ये किंचित वाढून ३.३ टक्के आणि २०२७ मध्ये ३.२ टक्के पातळीवर स्थिर राहण्याचा ‘आयएमएफ’चा अंदाज आहे. चीनसाठी २०२५-२६ मधील वाढीचा दर तिने ०.२ टक्क्यांनी वाढवून ५ टक्क्यांवर नेला आहे.
शेअर बाजारातील पडझड कायम
चालू वर्षासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दलच्या मजबूत दृष्टिकोनानंतरही, सोमवारी त्याचे शेअर बाजारात अपेक्षित सकारात्मक प्रतिबिंब उमटताना दिसले नाहीत. जगभरातील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पप्रणीत शुल्कवाढीच्या जोखमीबद्दलच्या चिंतेने बाजाराला ग्रासलेले दिसून आले. परिणामी सेन्सेक्स ३२४ अंशांनी, तर निफ्टी १०९ अंशांनी गडगडला. परकीय गुंतवणूकदार वेगाने माघारी परतत असल्याचा ताण रुपयाच्या मूल्यावरही दिसून आला आणि त्याने महिनाभरात दुसऱ्यांदा प्रतिडॉलर ९१ची पातळी ओलांडली.
