मुंबई: जुलैमध्ये मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात सरकारने मोठी कपात केली आहे. करांचा भार हलका झाल्यामुळे संघटित क्षेत्रातील सराफा व्यावसायिकांच्या उत्पन्नात चालू आर्थिक वर्षात २२ ते २५ टक्के वाढ दिसून येईल, असा अंदाज ‘क्रिसिल’ या पतमानांकन संस्थेच्या ताज्या अहवालाने सोमवारी वर्तविला.
हेही वाचा >>> नवीन राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच; पुढील दोन-तीन महिन्यांत घोषणा अपेक्षित
संघटित क्षेत्रातील देशभरातील ५८ सराफा व्यावसायिकांचे ‘क्रिसिल’ने सर्वेक्षण केले. देशातील संघटित सराफा व्यावसायिकांच्या उत्पन्नात या घटकांचा वाटा एक-तृतीयांश इतका आहे. दशकातील सर्वात निम्न पातळीवर आणल्या गेलेल्या आयात शुल्काचा मोठा फायदा होत असल्याचे या व्यावसायिकांनी म्हटले आहे. अनेक व्यावसायिकांनी दालनांच्या संख्येत विस्तार करण्याची योजना आखली आहे. यामुळे सध्या असलेल्या दालनांच्या संख्येत १२ ते १४ टक्क्क्यांनी विस्तार होईल.
हेही वाचा >>> अनुदानाविनाही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील -गडकरी
सोन्याचे भाव कमी झाल्याने व्यावसायिकांचा सुवर्ण साठ्यावरील खर्च कमी होऊन, अधिक खेळते भांडवल उपलब्ध झाले आहे, असे ‘क्रिसिल’च्या अहवालात म्हटले आहे. देशातील सोन्याच्या एकूण बाजारपेठेत संघटित क्षेत्राचा वाटा एक-तृतीयांश आहे. असंघटित क्षेत्राच्या तुलनेत संघटित क्षेत्राची वित्तीय कामगिरी चांगली राहणार आहे. आयात शुल्कात झालेली मोठी कपात उद्योगासाठी अगदी मोक्याच्या वेळी झाली आहे. कारण सराफा व्यावसायिक सणासुदीचा काळ आणि लग्नसराई यांची तयारी करीत आहेत. किमतीत घट झाल्याने सोन्याच्या विक्रीत चालू आर्थिक वर्षात ३ ते ५ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे, असे अहवालाने नमूद केले आहे.