विदेशात असणारा काळा पैसा पुन्हा भारतात आणण्याच्या आश्वासनाबाबत विरोधकांकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यानही हा मुद्दा वारंवार चर्चेला आला. या पार्श्वभूमीवर निवडणुका संपल्यानंतर स्विस बँकेकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, भारतीयांनी वेगवेगळ्या माध्यमातून स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या पैशामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या चार वर्षांतल्या नीचांकी पातळीवर भारतीयांच्या ठेवी पोहोचल्या असून ही घट तब्बल ७० टक्के इतकी असल्याचं स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेनं जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

स्विस बँकेत भारतीयांचा नेमका अधिकृत पैसा किती?

स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेनं जाहीर केलेल्या या निवेदनात स्विस बँकांमधील भारतीयांच्या पैशासंदर्भात आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीमध्ये कोणत्याही प्रकारच्या काळ्या पैशाचा उल्लेख नसून ही सर्व आकडेवारी भारतीयांकडून अधिकृतपणे स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या पैशांची असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. यानुसार, २०२३ वर्षाखेरीस स्विस बँकांमध्ये जमा भारतीयांच्या पैशाचा आकडा जवळपास १.०४ बिलियन स्विस फ्रँक्स (स्वित्झर्लंडचं चलन) अर्थात भारतीय चलनात जवळपास ९ हजार ७७१ कोटी रुपये इतका आहे. गेल्या चार वर्षांतलं हे नीचांकी प्रमाण आहे. २०२३-२४ या वर्षातली ही घट तब्बल ७० टक्के इतकी आहे.

सलग दोन वर्षं झाली घट!

गेल्या वर्षीही अशाच प्रकारे स्विस बँकांमधील भारतीयांच्या निधीमध्ये घट झाली होती. २०२१ मध्ये या ठेवींमध्ये १४ वर्षांतली सर्वाधिक वाढ झाली होती. हे प्रमाण तब्बल ३.८३ बिलियन स्विस फ्रँक्स इतकं वाढलं होतं. त्यानंतर मात्र २०२२ आणि २०२३ या वर्षाखेरीस घेण्यात आलेल्या आढाव्यात सलग दोन वर्षं स्विस बँकांमधील भारतीयांच्या ठेवींमध्ये घटच झाल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये स्विस बँकांमधील भारतीयांच्या थेट ठेवींप्रमाणेच केंद्रीय बँकेशी संलग्न देशातील इतर बँका आणि भारतातील अशा संलग्न बँकांमधील ठेवींचाही यात समावेश आहे.

भारतातून कोट्यधीशांचं आऊटगोईंग चालूच; यावर्षीही तब्बल ४,३०० धनाढ्य देश सोडणार

१.०४ बिलियन फ्रँक्समध्ये कुठल्या प्रकारचा पैसा?

दरम्यान, स्विस बँकेकडून या पैशाची विभागणीही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार २०२३ च्या अखेपर्यंत स्विस बँकांमध्ये असणाऱ्या भारतीयांच्या ठेवींमध्ये ३१० मिलियन फ्रँक्स हे थेट ग्राहकांच्या ठेवीच्या स्वरूपात आहेत. २०२२ च्या अखेरीस हा आकडा ३९४ मिलियन फ्रँक्स इतका होता. स्वित्झर्लंडमधील इतर संलग्न बँकांमधील ठेवींचा आकडा ४२७ मिलियन नोंद झाला आहे. २०२२ मध्ये या ठेवी १११० मिलियन फ्रँक्सच्या घरात होत्या. बँड, सुरक्षा ठेव आणि इतर साधनांच्या माध्यमातून ठेवलेल्या ठेवी २०२३ च्या १८९६ मिलियन फ्रँक्सवरून थेट ३०२ मिलिन फ्रँक्सपर्यंत खाली आल्या आहेत.

स्विस बँकांमधील ठेवींचा विक्रमी आकडा २००६ साली गाठला गेला होता. या वर्षी तब्बल ६.५ बिलियन फ्रँक्स इतकी भारतीयांची रक्कम स्विस बँकांमध्ये होती. त्यानंतर मात्र २०११, २०१३, २०१७, २०२० आणि २०२१ ही पाच वर्षं वगळता उर्वरीत वर्षी ही रक्कम घसरल्याचंच पाहायला मिळालं.