पीटीआय, नवी दिल्ली : देशातील प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीने सरलेल्या २०२५ वर्षात ४५.५ लाखांचा विक्रमी टप्पा गाठला, ज्यात वार्षिक तुलनेत ६ टक्क्यांची वाढ झाल्याचे गुरुवारी उपलब्ध आकडेवारीने दर्शविले.
वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत लागू झालेल्या ‘जीएसटी २.०’मुळे या वाढीला गती मिळाली. ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला मंदावलेल्या वाहन विक्रीच्या भरपाईस मदत झाली. वर्ष २०२५ मधील विक्रीतील वाढीचे नेतृत्व हे बाजार अग्रणी मारुती सुझुकी इंडिया, महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि स्कोडा ऑटो इंडिया यांनी केले. ज्यामुळे वाहन उद्योगाला २०२४ मध्ये नोंदवलेल्या ४३.०५ लाखांच्या विक्रीच्या उच्चांकाला मागे टाकता आले.
स्वदेशी वाहन उत्पादक महिंद्र अँड महिंद्र आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स यांनी दीर्घकाळापासून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ह्युंदाई मोटर इंडियाला मागे टाकून २०२५ मध्ये विक्रीच्या प्रमाणात अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. मारुतीपाठोपाठ सर्वाधिक वाहनांचा खप असलेल्या दक्षिण कोरियाची ही कंपनी चौथ्या स्थानावर लोटली गेली.
मारुती सुझुकी इंडियाने २०२५ मध्ये १८.४४ लाख प्रवासी वाहनांची विक्री केली. २०२४ मध्ये १७.९० लाख वाहनांची विक्री केली होती, असे कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, वितरण आणि विक्री, पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले. जीएसटी कपात, १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर सवलत आणि रिझर्व्ह बँकेकडून झालेली व्याजदर कपात यासारख्या अनुकूल घटकांनी २०२५ मध्ये वाहन उद्योगाच्या कामगिरीला मदत केली, असे त्यांनी नमूद केले.
