India Retail Inflation : किरकोळ महागाई दर सरलेल्या जुलै महिन्यात किंचित घटून ३.४५ टक्क्यांवर म्हणजेच पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी सोमवारी जाहीर केली.

एप्रिल महिन्यात ४.८३ टक्के असलेला किरकोळ महागाई दर घसरण होऊन मे महिन्यात तो ४.७५ टक्क्यांवर आला. ही त्याची मे २०२३ नंतरची नीचांकी पातळी ठरली. त्यावेळी महागाई दर ४.३१ टक्के पातळीवर होता. खाद्यवस्तूंतील किंमतवाढ मे महिन्यात ८.६९ टक्के नोंदविण्यात आली. एप्रिलमधील ८.७० टक्क्यांच्या तुलनेत ती नाममात्र घसरली असली, तरी एकूण निर्देशांकातील २६ टक्के घटकांमधील किंमतवाढीचा दर ५ टक्क्यांच्या आसपास राहिला, जो जानेवारी २०२० नंतरचा नीचांकी स्तर आहे. तरी खाद्यवस्तूंच्या घटकांतील, विशेषत: भाज्या आणि कडधान्यांसह विशिष्ट खाद्य श्रेणींमधील उच्च चलनवाढ हा चिंतेचा विषय असल्याचे, अर्थतज्ज्ञांचे म्हणणे होतं.

तर, वार्षिक किरकोळ महागाई जुलैमध्ये ३.५४ टक्के होती. जूनमध्ये हा दर ५.०८ होता. २०१९ पासूनची ही सर्वांत मोठी घसरण मानली जात आहे. अर्थशास्त्रांनी महागाईचा अंदाज ३.६५ टक्के ठेवला होता. गेल्यावर्षी जुलै महिन्यात चलनवाढ ७.४४ टक्के होता. हा दर मागच्या १५ महिन्यांपेक्षा उच्च होता. सप्टेंबर २०१९ मध्ये शेवटचा महागाईचा दर चार टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला होता. अन्नधानाच्या किंमती कमी झाल्याने महागाईचा दर घसरला आहे.

किरकोळ चलनवाढीचा जवळपास निम्मा वाटा असलेल्या अन्नधान्याच्या किमती गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत ५.४२ टक्के वाढला. तर, जूनमध्ये ९.३६ वाढला होता. जुलैमध्ये भाज्यांच्या किमतीत ६.८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी जून महिन्यात २९.३२ टक्के होती.

हेही वाचा >> Latest FD Rates: कोणत्या बँकेकडून एफडीवर सर्वाधिक व्याज मिळेल? ऑगस्ट महिन्यातील ताजे व्याज दर जाणून घ्या

चलनवाढ म्हणजे काय?

अर्थव्यवस्थेमध्ये लोकांच्या हातातील पैसा वाढला की लोक मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवा खरेदी करू लागतात. मोठ्या प्रमाणात खरेदी होत असेल तर सहाजिकच त्या वस्तू व सेवांची मागणीसुद्धा वाढते. मागणीमध्ये वाढ होत आहे, म्हणजेच त्याचा परिणाम हा किमतीवर होणे सहाजिक आहे. जशी वस्तू व सेवांची मागणी वाढत जाते, त्याचप्रमाणात त्या वस्तू महाग होतात. परंतु, ही किंमत वाढ एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये झालेली असते आणि ती वाढ अनियंत्रित व्हायला हवी; तेव्हा त्याला आपण किंमत वाढ असे म्हणू शकतो. जर किमती एक आठवडा किंवा काही दिवस वाढत असतील आणि काही दिवसांनंतर परत त्याच स्थितीमध्ये येत असतील, तर तेव्हा आपण त्याला किंमत वाढ म्हणू शकणार नाही. प्रा. पिगू यांच्या मते, “जेव्हा पैशातील उत्पन्न हे उत्पन्न वाढीच्या प्रक्रियेपेक्षा अधिक वेगाने वाढते, तेव्हा चलनवाढ निर्माण होते.” तसेच क्राउथर यांच्या मते,”चलनवाढ अशी स्थिती आहे की, ज्यामध्ये पैशांचे मूल्य घटते आणि किंमत पातळीत वाढ होते.’