नवी दिल्ली: यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे देशाच्या शेतकऱ्यांकडून वाढती मागणी पाहता, २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताची खत आयात ४१ टक्क्यांनी वाढून २२.३ दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे, असा अंदाज फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाने (एफएआय) मंगळवारी व्यक्त केला.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खत ग्राहक असलेल्या भारताने एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान १४.४५ दशलक्ष टन खतांची आयात केली आहे. जी गेल्या वर्षी झालेल्या ८.५६ दशलक्ष टनांच्या आयातीपेक्षा जवळपास ६९ टक्क्यांनी जास्त आहे, असे उद्योग संघटनेने म्हटले आहे. देशांतर्गत मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे आताच दिसत असून, खतांच्या आयातीतही वाढ झाली आहे, असे संघटनेचे अध्यक्ष एस. शंकरसुब्रमण्यम यांनी येथे आयोजित एफएआयच्या तीन दिवसांच्या वार्षिक चर्चासत्रापूर्वी पत्रकारांना सांगितले. १४ कोटींहून अधिक शेतकरी असलेल्या भारतात दरवर्षी सुमारे ७ कोटी टन खत वापरात येते, जे चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कोरोमंडेल इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक शंकर सुब्रमणियम म्हणाले, गेल्या दोन महिन्यांत भारतात मोठ्या प्रमाणात झालेल्या आयातीत, युरियाबरोबरीनेच, १.७ दशलक्ष टन डीएपी आणि ३.५ दशलक्ष टन एनपीके या खतांचा समावेश आहे. खरीप हंगामात काही तुटवडा निर्माण झाला असला तरी, एकूण पुरवठा पुरेसा राहिला, असे त्यांनी सांगितले.
सुमारे १५० हून अधिक खत निर्मिती कंपन्या भारताच्या जवळजवळ तीन-चतुर्थांश पीक पोषण गरजा पूर्ण करतात, तर उर्वरित गरज ही आयातीद्वारे भागवली जाते, असे असोसिएशनने म्हटले आहे. तिच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत खतांचे उत्पादन किरकोळ वाढून २९.९७ दशलक्ष टन झाले, जे गेल्या वर्षी २९.७५ दशलक्ष टन होते. देशांतर्गत उत्पादनात १७.१३ दशलक्ष टन युरिया, २.३२ दशलक्ष टन डीएपी, ७.०४ दशलक्ष टन एनपीके खते आणि ३.४८ दशलक्ष टन एसएसपीचा समावेश आहे. खत अनुदानापोटी १.९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त सरकारकडून २०२४-२५ मध्ये खर्च केले गेले आहेत.
पुरवठा मजबूत करण्यासाठी भारताने सौदी अरेबिया, जॉर्डन, मोरोक्को, कतार आणि रशियासह अन्य खत संसाधनांनी समृद्ध राष्ट्रांसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे, असे एफएआयने म्हटले आहे.
