मुंबई : भारत-अमेरिका व्यापार कराराच्या वाढत्या आशेमुळे आणि देशांतर्गत आघाडीवर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी माहिती-तंत्रज्ञान समभागांमध्ये (आयटी) खरेदीचा सपाटा लावल्याने बुधवारी बाजारात चैतन्य निर्माण केले.

बुधवारच्या सत्राअखेर सेन्सेक्स ५१३.४५ अंशांनी वधारून ८५,१८६.४७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ५६३.७५ अंश कमावत ८५,२३६.७७ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मंगळवारच्या सत्रात २६ हजार घसरलेल्या निफ्टीनेही पुन्हा १४२.६० अंशांची भर घालणारी उसळी घेत २६,०५२.६५ पातळी गाठली.

वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी, भारत आणि अमेरिकेतील प्रस्तावित व्यापार करार हा निष्पक्ष, समतोल आणि संतुलित असेल असे नमूद करत. याबाबत चांगली बातमी लवकरच ऐकायला मिळेल असे मंगळवारी भाष्य केले. त्यांच्या या विधानाने देखील बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.

केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या उत्साहवर्धक टिप्पणीनंतर भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दलच्या नव्या आशावादावर निर्देशांकांनी जोरदार मुसंडी मारली. मुख्यतः लार्जकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली. अमेरिकेतील रोजगार आकडेवारी आणि डॉलरमधील मजबूती ही ‘फेड’च्या दरकपातीची संकेत देणारी असून, त्या आशावादातून आयटी क्षेत्रातील समभागांत तेजी दिसून आली.

दुसरीकडे विलीनीकरणासंबंधी वृत्त आणि मूलभूत कामगिरीतील सुधारणेमुळे सरकारी बँकांच्या समभागांनी तेजी दर्शविली. पुढील धोरणात्मक संकेतांसाठी जगभरातील गुंतवणूकदारांचे आता ‘फेड’च्या बैठकीतील निर्णयाकडे लक्ष लागले आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समध्ये, एचसीएल टेक, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा आणि टायटन यांचे समभाग तेजीत होते. तर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, मारुती, अदानी पोर्ट्स आणि बजाज फायनान्सच्या समभागांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.