scorecardresearch

नवउद्यमींकडून २४ अब्ज डॉलरची निधी उभारणी, सरलेल्या वर्षात ३३ टक्क्यांची घसरण

२०१९ मध्ये १३.२ अब्ज डॉलर आणि २०२० मध्ये १०.९ अब्ज डॉलरचा निधी उभारला गेला.

नवउद्यमींकडून २४ अब्ज डॉलरची निधी उभारणी, सरलेल्या वर्षात ३३ टक्क्यांची घसरण
नवउद्यमींकडून २४ अब्ज डॉलरची निधी उभारणी, सरलेल्या वर्षात ३३ टक्क्यांची घसरण ( image courtesy Indian Express )

पीटीआय, नवी दिल्ली

भारतातील प्रथितयश नवउद्यमी उपक्रमांनी (युनिकॉर्न) सरलेल्या २०२२ मध्ये (कॅलेंडर वर्ष) २४ अब्ज डॉलरचा (सुमारे १.९५ लाख कोटी रुपये) निधी गुंतवणूकदारांकडून उभा केला आहे. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात ३३ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर २०१९ आणि २०२० च्या तुलनेत सरलेल्या वर्षात दुप्पट निधी उभारणी झाली, असे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या ‘पीडब्लूसी’च्या अहवालातून समोर आले आहे.

‘स्टार्टअप ट्रॅकर-सीवाय २०२२’ या अहवालानुसार, जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण असूनही जागतिक गुंतवणूकदार भारतीय नवउद्यमी परिसंस्थेबाबत सकारात्मक होते. कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये २४ अब्ज डॉलरची निधी उभारणी झाली. ती २०२१ च्या तुलनेत ३३ टक्के कमी राहिली आहे. त्या वर्षात ३५.२ अब्ज म्हणजेच २.८५ लाख कोटी रुपयांचा निधी उभारला होता. तर २०१९ मध्ये १३.२ अब्ज डॉलर आणि २०२० मध्ये १०.९ अब्ज डॉलरचा निधी उभारला गेला.

नवउद्यमी उपक्रमांमध्ये सास अर्थात सॉफ्टवेअर सेवा या क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित होत आहे. मात्र जागतिक पातळीवरील प्रतिकूल वातावरणामुळे नवउद्यमी खर्चाला आवर घालत असून विस्तार योजना पुढे ढकलत आहेत, असे ‘पीडब्लूसी’चे भागीदार अमित नावका म्हणाले. डिसेंबर २०२२ पर्यंत बेंगळूरु, एनसीआर आणि मुंबईमधील नवउद्यमींनी एकूण निधीच्या ८२ टक्के निधी उभारणी केली. बेंगळूरुमध्ये सर्वात जास्त नवउद्यमी आहेत, त्यानंतर एनसीआर आणि मुंबईचा क्रमांक लागतो. भारतात नवउद्यमींसाठी अनुकूल वातावरण असून सध्या देशात ६०,००० हून अधिक नवउद्यमी कार्यरत आहेत. जागतिक स्तरावरील १३ पैकी एक नवउद्यमी भारतात असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

युनिकॉर्न म्हणजे काय?

कंपनीने एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठल्यानंतर तिला युनिकॉर्न म्हटले जाते. तर भारतातील चार नवउद्यमी या डेकाकॉर्न म्हणजेच ज्यांनी दहा अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठली अशा आहेत. त्यामध्ये फ्लिपकार्ट, पेटीएम, बायजू आणि ओयो रूम्स यांचा समावेश होतो.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 14:42 IST

संबंधित बातम्या