देशाच्या औद्योगिक उत्पादनाने सरलेल्या जूनमध्ये मागील पाच महिन्यांतील सर्वात वाईट कामगिरी नोंदवली. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, वीज आणि खाणकाम क्षेत्रांनी चांगली कामगिरी करूनही, मुख्यत: निर्मिती क्षेत्राच्या गतिमंदतेने, औद्योगिक उत्पादनवाढीचा दर अवघा ४.२ टक्क्यांवर सीमित राहिला. देशातील कारखानदारीचे आरोग्यमान दर्शवणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी), आधीच्या मे महिन्यात ६.२ टक्के पातळीवर होता. एप्रिलमध्ये तो ५ टक्के, मार्चमध्ये ५.५ टक्के, फेब्रुवारीमध्ये ५.६ टक्के आणि जानेवारी २०२४ मध्ये ४.२ टक्क्यांवर होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून प्रसृत या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी म्हणजे जून २०२३ मध्येही औद्योगिक उत्पादन निर्देशांक अवघा ४ टक्क्यांनी वाढला होता. हेही वाचा >>>Hindenburg Research : हिंडेनबर्गप्रकरणी अर्थ मंत्रालयाकडून पहिली प्रतिक्रिया, सेबी आणि माधबी पुरी बुचबाबत म्हणाले… ताज्या आकडेवारीला गृहीत धरल्यास, एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही कालावधीत उत्पादन वाढ ५.२ टक्के राहिली, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ४.७ टक्के पातळीवर होती. खाणकाम क्षेत्रात उत्पादन वाढीचा वेग जूनमध्ये दमदार १०.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला, जो मागील वर्षीच्या जून महिन्यात ७.६ टक्क्यांवर होता. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ४.२ टक्के वाढीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये वीजनिर्मिती क्षेत्रही ८.६ टक्क्यांनी वाढले. ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंचे उत्पादन जून २०२३ मधील ६.८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ८.६ टक्के असे वाढले आहे. घसरण कुठे? त्याउलट यंदा जूनमध्ये निर्मिती क्षेत्राची वाढ निराशाजनक २.६ टक्के राहिली असून, जी गेल्या वर्षीच्या ३.५ टक्क्यांच्या तुलनेतही घसरली आहे. भांडवली वस्तूंच्या विभागातील वाढ यंदा २.४ टक्क्यांपर्यंत घसरली आहे जी मागील वर्षी याच महिन्यांत २.९ टक्क्यांवर होती. पायाभूत सुविधा, बांधकाम सामग्रीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातही मागील वर्षातील १३.३ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत, यंदाची वाढ अवघी ४.४ टक्के आहे.