पीटीआय, नवी दिल्ली
देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादनवाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) सरलेल्या मे महिन्यात १.२ टक्क्यांवर नोंदवला गेल्याचे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. देशाच्या उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक असलेल्या या निर्देशांकाने, मुख्यतः मान्सून लवकर सुरू झाल्यामुळे उत्पादन, खाणकाम आणि वीज क्षेत्रांच्या सुमार कामगिरीमुळे नऊ महिन्यांच्या नीचांकाला गाठले आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजेच मे २०२४ मध्ये ‘आयआयपी’ ६.३ टक्के नोंदवला गेला होता. त्याआधीच्या एप्रिल २०२५ मध्ये आयआयपी दराने २.६ टक्के वाढ नोंदवली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मे २०२५ मध्ये खाणकामाची कामगिरी सुमार राहिली असून या क्षेत्रातून उत्पादन गेल्या वर्षीच्या ६.६ टक्क्यांवरून, यंदा ६.५ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. तर उत्पादन क्षेत्राची वाढ २.६ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात ५.१ टक्के नोंदवली गेली होती. तर वीजनिर्मिती क्षेत्राची वाढ गेल्या वर्षीच्या १३.७ टक्क्यांवरून, ५.८ टक्क्यांपर्यंत खुंटली आहे. तसेच मे २०२५ मध्ये पायाभूत सुविधा/ बांधकाम वस्तूंमध्ये ६.३ टक्क्यांनी वाढ झाली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ७.६ टक्क्यांपेक्षा कमी आहे. सरलेल्या मे महिन्यात प्राथमिक वस्तूंचे उत्पादन १.९ टक्क्यांनी कमी झाले, जे गेल्या वर्षी ७.३ टक्के राहिले होते.
विद्यमान आर्थिक वर्षाच्या एप्रिल-मे या कालावधीत, औद्योगिक उत्पादनात १.८ टक्क्यांनी वाढ झाली, जी गेल्या वर्षी ५.७ टक्के नोंदवली गेली होती. मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे खाणकाम आणि विजेची मागणी कमी झाली. मे २०२५ मध्ये या दोन्ही उप-क्षेत्रांमध्ये उत्पादन क्षेत्रातील वाढीच्या मंदीमुळे घट झाली, असे इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या.