नवी दिल्ली : घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई सलग दुसऱ्या महिन्यात चढता क्रम कायम असून, सरलेल्या डिसेंबर महिन्यांत तो ०.८३ टक्के नोंदवला गेल्याचे बुधवारी जाहीर अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. खाद्यान्न आणि उत्पादित वस्तूंच्या किमती महिनागणिक वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे.
मागील दोन महिन्यांत शून्याखालील उणे पातळीवर राहिलेला घाऊक महागाई दर डिसेंबरमध्ये पुन्हा सकारात्मक झाला आहे. नोव्हेंबर आणि ऑक्टोबरमध्ये, हा दर अनुक्रमे उणे (-) ०.३२ टक्के आणि उणे (-) १.२१ टक्के असा नकारात्मक राहिला होता. याउलट, गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर २०२४ मध्ये घाऊक किंमत महागाई दर २.५७ टक्के नोंदवला गेला होता.
डिसेंबर २०२५ मधील महागाईचा सकारात्मक दर प्रामुख्याने तयार उत्पादने, खनिजे, यंत्रसामग्री आणि उपकरणे, खाद्यान्न आणि वस्त्रोद्योग इत्यादींच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे आहे, असे उद्योग मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. घाऊक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, अन्नपदार्थांमधील महागाई दर डिसेंबरमध्ये उणे ०.४३ टक्के होता, तर नोव्हेंबरमध्ये तो उणे ४.१६ टक्के नोंदवला गेला.
भाजीपाल्यामधील महागाई देखील वाढली आहे, डिसेंबरमध्ये ती उणे ३.५० टक्के होते, तर नोव्हेंबरमध्ये ती उणे २०.२३ टक्के नोंदवली गेली होती. उत्पादित वस्तूंच्या बाबतीत, किंमतवाढ नोव्हेंबर २०२५ मधील १.३३ टक्क्यांवरून किंचित वाढून १.८२ टक्क्यांवर पोहोचली आहे.
बिगर-अन्न वस्तूंच्या श्रेणीत डिसेंबरमध्ये २.९५ टक्के महागाई दिसून आली, तर नोव्हेंबरमध्ये ती २.२७ टक्के होती. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात नकारात्मक महागाई दर कायम असून, डिसेंबरमध्ये तो उणे २.३१ टक्के होता, तर एका महिन्यापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात तो उणे २.२७ टक्के होता.
या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, वाढत्या अन्नधान्याच्या किमतींमुळे देशातील किरकोळ महागाई दर देखील नोव्हेंबरमधील ०.७१ टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये किंचित वाढून १.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या सहनशील पातळीपेक्षा अजूनही कमी राहिल्यामुळे विद्यमान आर्थिक वर्षात रेपो दरात १.२५ टक्क्यांची कपात केली गेली आहे. अर्थव्यवस्थेत चांगल्या वाढीसह, वेगाने महागाई कमी होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात, चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज लक्षणीयरीत्या कमी करून तो पूर्वीच्या २.६ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आणला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था सध्या उच्च विकास दर आणि कमी झालेला महागाई दराचा दुर्मिळ ‘सुवर्ण पर्व’ अनुभवत असल्याचे सांगून, रिझर्व्ह बँकेचे गव्व्हर्नर संजय मल्होत्रा यांनी गेल्या महिन्यात, रेपो दर २५ आधार बिंदूंनी कमी करत तो ५.२५ टक्क्यांवर आणला आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२६ साठी जीडीपी वाढीचा अंदाज पूर्वीच्या ६.८ टक्क्यांवरून सुधारून ७.३ टक्के केला आहे.

