नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या इन्फोसिसने सरलेल्या डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात २.२ टक्क्यांची घट नोंदवली आहे. नफा गेल्या वर्षी याच तिमाहीतील ६,८०६ कोटींवरून कमी होऊन ६,६५४ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचा महसूल मात्र ८.८९ टक्क्यांनी वाढून ४५,४७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ४१,७६४ कोटी रुपये होता. मागील तिमाहीत कंपनीने ४४,४९० कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता. तिमाही आधारवर महसुलात २.२२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
तिसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न ४६,६१८ कोटी रुपये राहिले, जे वार्षिक तुलनेत ४२,६२३ कोटी रुपयांच्या तुलनेत ९.३७ टक्क्यांनी अधिक आहे. जागतिक स्तरावर ग्राहक इन्फोसिसला त्यांच्या कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय भागीदार म्हणून पाहत आहे, ज्यांच्याकडे सिद्ध कौशल्य, नाविन्यपूर्ण क्षमता आणि मजबूत वितरण क्षमता आहे. यामुळे त्यांना व्यवसायाची क्षमता विस्तार करण्यास आणि मूल्य प्राप्ती वाढविण्यात मदत झाली आहे.
या प्रवासात आमच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षित करणे, रूपांतरित करणे आणि सक्षम करणे ही वचनबद्धता केंद्रस्थानी आहे, जेणेकरून एआयच्या नवं तंत्रज्ञान विश्वात यश मिळवता येईल, असे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले. बुधवारच्या सत्रात इन्फोसिसचा समभाग १५९९.८८ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ६,४८,६६५ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.
