पीटीआय, नवी दिल्ली

अर्थव्यवस्थेचा गाभा व्यापणाऱ्या आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांच्या विकास दरात जूनमध्ये लक्षणीय घट नोंदविण्यात आली. बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात तो २० महिन्यांच्या नीचांकी म्हणजेच ४ टक्क्यांपर्यंत मंदावल्याचे स्पष्ट झाले. आधीच्या मे महिन्यात त्यात ६.४ टक्के वाढ नोंदवली गेली होता.

सरलेल्या जूनमध्ये खनिज तेल आणि शुद्धीकरण उत्पादने यांत अनुक्रमे उणे (-) २.६ टक्के आणि उणे (-) १.५ टक्के अशी स्थिती राहिली. तर नैसर्गिक वायू, खते, पोलाद आणि सिमेंटच्या उत्पादनातील वाढीचा दर अनुक्रमे ३.३ टक्के, २.४ टक्के, २.७ टक्के आणि १.९ टक्क्यांपर्यंत घसरला. कोळसा आणि वीजनिर्मितीतील वाढ अनुक्रमे १४.८ टक्के आणि ७.७ टक्के अशी जोमदार राहिली आहे. गेल्या वर्षी म्हणजे जून २०२३ मध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या प्रमुख क्षेत्रांची वाढ ८.४ टक्के होती.

हेही वाचा >>>वित्तीय तूट पहिल्या तिमाहीत वार्षिक अंदाजाच्या ८.१ टक्क्यांवर

याआधीचा नीचांकी दर ऑक्टोबर २०२२ मध्ये ०.७ टक्के नोंदवला गेला होता. आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत पायाभूत क्षेत्रांचा उत्पादन दर ५.७ टक्के नोंदवण्यात आला, जो मागील आर्थिक वर्षातील याच तिमाही कालावधीतील ६ टक्के होता.

मे २०२४ च्या तुलनेत कोळसा, खते आणि सिमेंट वगळता आठपैकी पाच घटकांमध्ये वाढ घटल्याने, एकंदर वाढीला पाचर बसून, तो २० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर नोंदवला गेला, असे इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले. देशाच्या कारखानदारीचे मापन असलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकांत या आठ प्रमुख क्षेत्रांचे ४०.२७ टक्के योगदान असून, त्यांच्या मंदावण्याचे प्रतिबिंब या निर्देशांकातही उमटताना दिसून येईल.