मुंबई : राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्याने येत्या २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोरेगावस्थित नेस्को संकुलात, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनद्वारे नवव्या ‘इंटरनॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या गणवेष मेळ्याचे उद्घाटन होणार आहे.
राज्यातील वस्त्रोद्योग आणि परिधान क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून या प्रदर्शनाकडे पाहिले जात आहे. यात १५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नाममुद्रा प्रदर्शनांत सहभागी होत असून, ३०,००० पेक्षा अधिक गणवेष रचना आणि १५,००० हून अधिक कापडाच्या नाविन्यता प्रदर्शित केल्या जाणार आहेत. राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे आणि माजी वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांचीही उद्घाटनासमयी उपस्थिती असेल.
तब्बल ६५०० कोटी डॉलरचा टप्पा ओलांडत असलेल्या जागतिक गणवेष बाजारपेठेतील वाढीच्या खुणावत असलेल्या संधी पाहता, वितरक, डीलर्स, रिटेलर्स, संस्थात्मक आणि कॉर्पोरेट खरेदीदार तसेच देश-विदेशातील व्यावसायिकांना जोडणारे हे प्रदर्शन एक उत्कृष्ट व्यासपीठ बनेल, असा आयोजकांना विश्वास आहे.
एआय-आधारित व्हर्च्युअल युनिफॉर्म फॅशन शो ही या उद्योगातील अभिनव संकल्पना या निमित्ताने पहिल्यांदाच साकारली जाताना पाहता येईल, असे आयोजन समितीचे अध्यक्ष अजय रंगरेज म्हणाले. तंत्रज्ञान आणि डिझाइनमधील बदलांचे स्वागत करत हे प्रदर्शन भविष्यातील युनिफॉर्म उद्योगासाठी नवीन मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शाळा, हॉस्पिटल, हॉटेल, कॉर्पोरेट, स्पोर्ट्सवेअर, वर्कवेअर, फॅब्रिक्स आणि अॅक्सेसरीज युनिफॉर्मशी संबंधित सर्व काही एकाच छताखाली प्रदर्शित केले जाणार आहे. हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सर्वप्रथम २०१७ साली सोलापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या पाठिंब्याने सुरू करण्यात आले. त्यानंतर हे प्रदर्शन बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि वाराणसीपर्यंत विस्तारत गेले आणि ‘मेक इन इंडिया’ला चालना देणारे जागतिक पातळीवरील प्रमुख बी२बी व्यासपीठ म्हणून उदयास आले.
