मुंबई : भांडवली बाजाराची उच्चांकी दौड सुरूच राहणार का आणि पुन्हा सत्तेत आलेल्या नवीन सरकारच्या धोरणांमुळे कोणत्या क्षेत्रांना ऊर्जा मिळणार? मग अशा विविध प्रश्नांच्या गर्दीत नेमकी गुंतवणूक कशी आणि कुठे करावी? याचे खास मार्गदर्शन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात ‘एमएमआरडीए’च्या कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी, १३ जूनला ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ कार्यक्रमातून केले जाणार आहे.

गुंतवणूकदार साक्षरतेचा भाग म्हणून आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आयोजित ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ हा मार्गदर्शनपर उपक्रम गुरुवार, १३ जूनला दुपारी ३ वाजता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पोडियम हॉल, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व) येथे होत आहे. या निमित्ताने गुंतवणूकदारांना सहभागी तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि गुंतवणुकीसंबंधी त्यांच्या मनांतील प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा कार्यक्रम केवळ मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीच आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> ‘एनपीएस’अंतर्गत महाराष्ट्रातून देशात सर्वाधिक १६ टक्के सदस्य नोंदणी

शेअर बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीने उच्चांकी पातळी गाठली आहे. मात्र तापलेली महागाई आणि घटणारे व्याजाचे दर असे सर्वसामान्यांपुढे दुहेरी संकट कायम आहे. अशा स्थितीत पैशाने पैसा वाढवायचा तर गुंतवणूक करावीच लागेल आणि पैसा गुंतवायचा तर कमी-जास्त का असेना जोखीम घ्यावीच लागेल. महिन्याकाठी खर्च वजा जाता गाठीशी राहणारा पैसा वेगवेगळय़ा गुंतवणूक पर्यायांमध्ये विभागून जोखीम कशी टाळावी, तसेच गुंतवणुकीचे वेगवेगळ्या वाटांचे दिशादर्शन म्हणून हा कार्यक्रम सर्वांनाच मदतकारक ठरेल.

हेही वाचा >>> स्टेट बँक कर्ज रोख्यांद्वारे ३०० कोटी डॉलर उभारणार

या कार्यक्रमात ‘बाजार अस्थिरतेत गुंतवणूक कशी आणि कुठे?’ या विषयावर अर्थ-अभ्यासक व वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी मार्गदर्शन करतील.

नवीन सरकार नुकतेच सत्तेवर आले असून लवकरच विद्यमान आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पाचा अंदाज घेत, गुंतवणुकीच्या धोरणात कोणते बदल करावेत आणि कोणते पर्याय निवडावेत याची दिशा म्हणूनही गुंतवणूकदारांसाठी हा कार्यक्रम निश्चितच उद्बोधक ठरेल.

कधी? गुरुवार, १३ जून २०२४, दुपारी ३ वाजता

कुठे? मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पोडियम हॉल, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व)

तज्ज्ञ मार्गदर्शक : कौस्तुभ जोशी (बाजार अस्थिरतेत गुंतवणूक कशी आणि कुठे?)

प्रवेश केवळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित

(Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.)