पीटीआय, नवी दिल्ली भांडवली बाजारात नित्य रूपात दैनंदिन व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांबाबत अनेक रंजक बाबी बाजार नियामक ‘सेबी’च्या पाहणीतून पुढे आल्या आहेत. बाजारात विवाहित गुंतवणूकदारांचे नफा कमावण्याचे प्रमाण अधिक असून, त्याउलट नुकसान होणाऱ्यांमध्ये अविवाहितांची बहुसंख्या आहे. भांडवली बाजारात होणाऱ्या दैनंदिन व्यवहारांचा (डे-ट्रेडिंग) अभ्यास सेबीने केला. या अभ्यासातून व्यवहार करण्याची पद्धती ही शेअरधारक हा विवाहित की अविवाहित यावर अवलंबून असल्याचे समोर आले आहे. अनेक महत्त्वाच्या निकषांवर विचार करता, विवाहित शेअरधारक हे अविवाहित शेअरधारकांपेक्षा अधिक नफा कमावतात. गेल्या तीन वर्षांत नफा कमावणाऱ्या शेअरधारकांमध्ये विवाहितांचे प्रमाण अधिक, तर अविवाहितांचे प्रमाण कमी आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये अविवाहित शेअरधारकांपैकी ७५ टक्के तोटा झालेले होते, तर विवाहित शेअरधारकांपैकी ६७ टक्के तोटा झालेले होते. याचबरोबर गेल्या तीन वर्षांत अविवाहितांच्या तुलनेत विवाहित शेअरधारकांच्या व्यवहारांची संख्या आणि मूल्यही अधिक आहे. त्यामुळे त्यांचा अधिक सहभाग भांडवली बाजारात दिसून येतो, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. या पाहणीत, सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा, नित्य म्हणजेच ज्या दिवशी खरेदी केली त्याच दिवशी विकणारे ‘ट्रेडर’ आणि त्यांच्या व्यवहार प्रवृत्तीवर भर देण्यात आला. हेही वाचा >>>आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक विक्रीला वेग; संभाव्य खरेदीदारांवर रिझर्व्ह बँकेचे शिक्कामोर्तब लवकरच ‘सेबी’च्या पाहणीनुसार, कमी वय असलेल्या वयोगटातील ‘ट्रेडर’ना तोटा होण्याचे प्रमाण अधिक आहे. तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, ६० वर्षांहून अधिक वयोगटातील ट्रेडरना तोटा होण्याचे प्रमाण ५३ टक्के, तर २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या ट्रेडरना तोटा होण्याचे प्रमाण ८१ टक्के असे सर्वाधिक आहे. शेअर बाजारात रोखीत (कॅश) आणि फ्युचर व ऑप्शन (वायदे) अशा दोन प्रकारे व्यवहार होतात. यापैकी कॅश श्रेणीतील १० पैकी ७ ट्रेडरनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात तोटा नोंदवला. त्याच वेळी, २०१८-१९ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये कॅश श्रेणीत इंट्राडे व्यवहारात भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हेही वाचा >>>Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचे भाव कोसळले; १० ग्रॅमचा भाव ऐकून आताच सराफा बाजार गाठाल! महिलाच अधिक नफाक्षम पुरुषांच्या तुलनेत महिला या सातत्याने भांडवली बाजारातून अधिक नफा कमावत आहेत. गेल्या तीन वर्षांत पुरुषांच्या तुलनेत नफा कमावणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. यातून महिला गुंतवणूकदारांचे व्यवहार कौशल्य दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १ कोटी उलाढाल असलेल्या पुरुषांचा सरासरी तोटा ३८ हजार ५७० रुपये होता. त्याचवेळी महिलांचा सरासरी तोटा २२ हजार १५३ रुपये होता, असेही सेबीच्या अहवालातून समोर आले आहे.