मुंबई: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि अमेरिकेतील महाकाय वित्तीय समूह असलेला ब्लॅकरॉक यांच्यातील संयुक्त समान भागीदारीतील उपक्रम असलेल्या जिओ ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने सोमवारी कामकाज चालविण्यासाठी त्यांच्या कार्यकारी नेतृत्व संघाची नियुक्ती जाहीर केली.
म्युच्युअल फंड व्यवसायातील या नवागत कंपनीने गेल्या महिन्यातच सीड स्वामिनाथन यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. आता त्यांच्यासह जिओ ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटच्या नेतृत्वदायी संघामध्ये मालमत्ता व्यवस्थापन अनुभव, डिजिटल नवोन्मेष आणि ग्राहककेंद्री उत्पादन विकसन यातील तज्ज्ञतेला एकत्र आणले गेले आहे,असे फंड घराण्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जिओ ब्लॅकरॉकने अमित भोसले यांना मुख्य जोखीम अधिकारी, अमोल पै यांना मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि बिरजा त्रिपाठी यांना उत्पादन प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अधिक सुलभ आणि परवडणारी बनवून, भारतात गुंतवणुकीचे परिदृश्य बदलण्याचे जिओ ब्लॅरॉकचे ध्येय आहे. कंपनीला २६ मे २०२५ रोजी, म्युच्युअल फंड व्यवसायाचे कामकाज सुरू करण्यासाठी ‘सेबी’ने हिरवा कंदील दिला आहे.