मुंबई: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने विमा क्षेत्रात संयुक्त भागीदारीत कंपनी स्थापित करण्यासाठी वित्तीय सेवा क्षेत्रातील जागतिक समूह अलायन्झशी चर्चा सुरू केली आहे. जर्मनीच्या अलायन्झ एसईच्या देशात सध्या दोन संयुक्त विमा भागीदाऱ्या सुरू असून, त्या संपुष्टात आणून मुकेश अंबानी यांच्या नियंत्रणाखालील कंपनीशी नव्याने घरोबा करण्याचा तिचा प्रयत्न आहे.
हेही वाचा >>> ‘एआय’ नवोपक्रमांसाठी रिलायन्स, एनव्हीडिया भागीदारी
जिओ फायनान्शियल-अलायन्झ भागीदारी सामान्य विमा आणि जीवन विमा अशा दोन्ही क्षेत्रांत स्वतंत्र कंपन्या स्थापन करतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तथापि या संबंधाने चर्चा सध्या प्रारंभिक टप्प्यावर असून, उभयतांकडून अद्याप भागीदारी योजनेविषयी कोणताही निर्णय झाला नसल्याचे वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. दोन्ही कंपन्यांच्या प्रवक्त्यांनी या संबंधी कोणतेही भाष्य करण्यास नकार दर्शविला. तथापि अलायन्झने बजाज फिनसर्व्ह लिमिटेडबरोबर विमा क्षेत्रात सुरू असलेल्या भागीदारीतून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
हेही वाचा >>> ‘सिरमा’चा रांजणगावमध्ये उत्पादन प्रकल्प
जिओ फायनान्शियलने के.व्ही. कामथ यांच्यासारख्या बँकिंग क्षेत्रातील दिग्गजांची कंपनीचे संचालक आणि बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून, बँकेतर वित्तीय सेवा आणि विमा वितरणाचा व्यवसाय सध्या कंपनीकडून चालविला जात आहे. तर मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय सुरू करण्यासाठी तिने ब्लॅकरॉक इन्क.शी भागीदारी घोषित केली आहे.