मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या स्पाईसजेट या विमान कंपनीकडून आगामी काळात सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. विमानांची संख्या कमी झाल्याने खर्चात कपातीसह, कामकाजात सुरळीत करण्यासाठी हे पाऊल उचलणार असल्याचे कंपनीने सोमवारी स्पष्ट केले.विमान प्रवासी क्षेत्रातील स्पाईसजेटसमोर सध्या वित्तीय, कायदेशीर आणि इतर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांना तोंड देत असताना, आर्थिक दायीत्व कमी करण्यासाठी कंपनीकडून मनुष्यबळात कपात केली जाणार आहे. हेही वाचा >>> ‘पेटीएमवरील कारवाईचा फेरविचार नाही’; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्पष्टोक्ती कंपनीच्या ताफ्यातील विमानांची संख्या देखील कमी झाली असून, त्या तुलनेत देखील मनुष्यबळ जास्त ठरत आहे. नेमकी किती कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार याबाबत या आठवड्यात अंतिम निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने अधिकृतपणे दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले की, कंपनीने खर्चात कपात करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यात मनुष्यबळ कमी करण्याच्या उपायाचाही समावेश आहे. नफ्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही पावले उचलली जात आहे. हेही वाचा >>> किरकोळ महागाईचा अल्प-दिलासा; जानेवारीत तीन महिन्यांच्या नीचांकी ५.१ टक्क्यांवर स्पाईसजेटमध्ये सध्या सुमारे ९,००० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील १० ते १५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. खर्चात कपात करून वार्षिक बचत १०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने १५ टक्के मनुष्यबळ कमी करण्याचा निर्णय घेतल्यास सुमारे १,३५० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल. सरलेल्या २०२३ सालात या स्पाईटजेटद्वारे ८३.९० लाख प्रवाशांनी हवाई सफर केली, देशांतर्गत हवाई क्षेत्रात कंपनीचा ५.५ टक्के बाजारहिस्सा आहे.