नवी दिल्ली : एचडीएफसी लाइफचे संस्थापक अध्यक्ष दीपक पारेख गुरुवारी कंपनीच्या अध्यक्ष आणि गैर-कार्यकारी संचालक पदावरून पायउतार झाले, असे कंपनीने भांडवली बाजारांना कळवले. केकी एम मिस्त्री यांची तत्काळ प्रभावाने अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिस्त्री यांच्या नियुक्तीला गुरुवारी संचालक मंडळाने एकमताने मंजुरी दिली.

हेही वाचा >>> लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प

मिस्त्री, हे सनदी लेखापाल आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे सहकारी सदस्य आहेत. ते हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एचडीएफसीचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. एचडीएफसी बँकेसोबत एचडीएफसी लिमिटेडचे विलीनीकरण झाल्यामुळे, मिस्त्री एचडीएफसी लिमिटेडमधून निवृत्त झाले आणि त्यांची एचडीएफसी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळावर गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते इतर अनेक प्रमुख कंपन्यांच्या संचालक मंडळावर देखील कार्यरत आहेत. याचवेळी कंपनीने वेंकटरामन श्रीनिवासन यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली.

हेही वाचा >>> इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ

निव्वळ नफा ४१२ कोटींवर सरलेल्या मार्च तिमाहीत एचडीएफसी लाइफचा निव्वळ नफा १५ टक्क्यांनी वधारून ४१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत नफा ३५९ कोटी रुपये होता. मार्च तिमाहीत २७,८९३ कोटींचे एकूण उत्पन्न मिळवले. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कंपनीने प्रतिसमभाग २ रुपयांचा अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे.