खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या कोटक महिंद्र बँकेचे संचालक मंडळ पुढील आठवड्यात २१ नोव्हेंबरला नियोजित बैठकीत समभागांच्या विभाजनाच्या प्रस्तावावर विचार करणार आहे, असे बँकेने शुक्रवारी बाजारमंचांना सूचित केले.कोटक महिंद्र बँकेने आतापर्यंत समभागांचे विभाजन आणि बक्षीस समभाग (बोनस शेअर) देऊन भागधारकांना उपकृत केले आहे.

कोटक महिंद्र बँकेच्या समभागांचे सध्याचे दर्शनी मूल्य प्रत्येकी ५ रुपये आहे. २०१० मध्ये १० रुपये दर्शनी मूल्याचा समभाग दोन भागांत विभागून ५ रुपये करण्यात आला आहे. तर जुलै २०१५ मध्ये एकास एक (१:१) या प्रमाणात बक्षीस समभाग बँकेने भागधारकांना दिला आहे. ताज्या प्रस्तावानुरूप, समभागाच्या विभाजनाचे प्रमाण आणि त्यासाठी भागधारकांची पात्रता निश्चित करणारी रेकॉर्ड तारीख याबद्दल देखील संचालक मंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल.

कोटक महिंद्र बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ३,२५३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३,३४४ कोटी रुपयांवरून ३ टक्क्यांनी घटला आहे. शुक्रवारच्या सत्रात कोटक महिंद्र बँकेचा समभाग ७.६० रुपयांनी वधारून २,०८२.८० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार, ४.१३ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.

समभाग विभाजन म्हणजे काय?

कंपनी तिच्या विद्यमान समभागांना लहान भागांमध्ये विभागून त्याचे दर्शनी मूल्य त्या प्रमाणात कमी करते त्याला समभाग विभाजन (स्टॉक स्प्लिट) म्हटले जाते. जसे २०१० मध्ये कोटक महिंद्र बँकेने १० रुपयांचा समभागाचे दोन तुकडे करून त्याचे दर्शनी मूल्य ५ रुपये केले. या समभाग विभाजनामुळे बँकेच्या पात्र भागधारकांकडील समभागांची संख्या दुपटीने वाढू शकली. समभाग विभाजनाच्या परिणामी बाजारातील समभागांचा व्यापार वाढून ते तरलतेला पूरक ठरते. मात्र यातून भागधारकांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य अपरिवर्तित राहते. कारण समभागांची संख्या जरी वाढत असली तरी त्या प्रमाणात समभागांची किंमत देखील कमी होते.