पुणे : वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसाठी संगणकीय प्रणाली विकसित करणाऱ्या केपीआयटी टेक्नॉलॉजीज कंपनीने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत २०३ कोटी रुपयांचा करोत्तर नफा नोंदविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ४४.७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
आधुनिक संगणकीय प्रणालीचा वापर वाहनांमध्ये वाढत आहे. या क्षेत्रात कंपनीच्या वाढीला गती मिळाली आहे. आशियातून कंपनीच्या कार्यादेशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचबरोबर प्रवासी वाहन क्षेत्रात कंपनीचा व्यवसाय वाढत आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत उत्पन्नात मोठी वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचे उत्पन्न २०.१ टक्क्यांनी वाढून १७.३ कोटी डॉलरवर पोहोचले आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत २०.७ कोटी डॉलरचे नवीन कार्यादेश मिळविले. कंपनीने वाहननिर्मिती क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांसोबत काम मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.
हेही वाचा >>> ‘मायक्रोफायनान्स’ संस्थांना अवाजवी कर्ज देण्यापासून परावृत्त करणे आवश्यक
या वेळी बोलताना कंपनीचे सहसंस्थापक, मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील म्हणाले की, योग्यपणे संतुलित वाढीचा तिमाही निकाल सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. बदलत्या नियामक चौकटीमुळे वाहन उद्योग कायम बदलाच्या उंबरठ्यावर आहेत. यापुढील काळात तंत्रज्ञानातील आमची गुंतवणूक कायम राहील. या माध्यमातून आम्ही बाजारपेठेत आघाडीवर राहू. कंपनीचे अध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक सचिन टिकेकर म्हणाले की, वाहन उद्योगात मोठे बदल होत असून, ग्राहकांच्या खर्चात कपात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. संगणकीय प्रणाली विकसित करून तिचा वापर करण्याचा कालावधी कमी करण्यावर आमचा भर आहे.