जागतिक मंदीमुळे जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. यात आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे. अमेरिकेतील 3M या कंपनीने ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात कंपनीने सांगितले की, अलीकडच्या काळात कंपनीच्या खर्चात वाढ झाली असून कामकाजात मात्र घट झाली आहे. अशा स्थितीत खर्च कमी करण्यासाठी कंपनीने अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
3M कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, आम्ही वार्षिक खर्च मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या वार्षिक खर्चात किमान ९०० मिलियन डॉलर कपात करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अशा स्थितीत कंपनीने कर्मचारी कपातीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ६ हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीने २५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. आता नव्याने केलेल्या टाळेबंदीच्या घोषणेनंतर, कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकूण १० टक्के म्हणजेच ८५०० कर्मचाऱ्यांची घट झाली आहे.
यावर 3M चे सीईओ माईक रोमन म्हणाले की, नफा वाढवण्यासाठी कंपनी आवश्यक असणारी सर्व पावले उचलत आहे. यामुळे कंपनीला गो-टू-मार्केट बिझनेस मॉडेल्स व्यवस्थितरीत्या राबवता येणार आहे. यामुळे कंपनीला मार्जिन आणि रोखप्रवाह सुधारण्यास मदत होईल.
कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यापासून शेअर बाजारात एक टक्क्यांनी घसरण झाली आहे. कर्मचारी कपातीच्या घोषणेसोबतच कंपनीने आपल्या व्यवस्थापनातही मोठे बदल केले आहेत. 3M.Co.पोस्ट इन नोट्स, रेस्पिरेटर आणि स्मार्टफोन डिस्प्ले बनवणारी कंपनी आहे. उत्पादन क्षेत्रातील या प्रमुख कंपनीने सलग पाचव्या तिमाहीत विक्रीत घट नोंदवली. २०२२ च्या सुरुवातीपासून 3M च्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. २०२३ च्या पहिल्या तिमाहित 3M ने ८ अब्ज डॉलरची विक्री नोंदवली.