मुंबईः एलआयसी म्युच्युअल फंडाने तिचे पाच प्रमुख समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंड पुन्हा प्रस्तुत करत असल्याचे बुधवारी घोषित केले. या पाचपैकी चार योजना या आयडीबीआय म्युच्युअल फंडांच्या जुलै २०२३ मध्ये झालेल्या विलीनीकरणातून या फंड घराण्याकडे संक्रमित झालेल्या आहेत.
एलआयसी म्युच्युअल फंड तिच्या व्हॅल्यू फंड, स्मॉल कॅप फंड, डिव्हिडंड यील्ड फंड, फोकस्ड फंड आणि एलआयसी एमएफ मल्टी ॲसेट अलोकेशन फंड या पाच इक्विटी योजना नव्याने तिच्या वितरण जाळ्यातून प्रस्तुत करेल, असे एलआयसी म्युच्युअल फंड ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी रवी कुमार झा म्हणाले. यापैकी पहिल्या चार योजना या पूर्वाश्रमीच्या आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या असून, त्यांच्या हस्तांतरणानंतर एलआयसी म्युच्युअल फंडांच्या विस्तृत वितरण जाळ्यापर्यंत त्या पुरेशा पोहोचल्या नव्हत्या.
बाजाराच्या बदलत्या गतिशीलतेला अनुसरून त्या संबंधाने नव्याने जागृती निर्माण करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशानेच पुनःप्रस्तुतीचे हे पाऊल टाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गुंतवणूकदारांसाठी लक्षणीय संपत्ती निर्माण करून, त्यांच्या विविध आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची क्षमता असलेल्या या नव्याने प्रस्तुत इक्विटी योजनांमध्ये प्रत्येकी १,००० ते १,५०० कोटी रुपयांच्या व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता (एयूएम) गोळा करण्याची क्षमता आहे, असे फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी योगेश पाटील म्हणाले.
आयडीबीआयकडून या योजना हस्तांतरित झाल्या तेव्हा त्यांची एकूण मालमत्ता सुमारे ६०० कोटी रुपये होती, जी एप्रिल २०२५ अखेर १,९१५ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. शिवाय फेब्रुवारीतच ‘एनएफओ’द्वारे दाखल झालेल्या मल्टी-ॲसेट अलोकेशन फंडानेही ५५३ कोटी रुपयांची मालमत्ता मिळविली आहे. तथापि मार्च २०२६ पर्यंत या फंडांची मालमत्ता सुमारे ६,००० कोटी रुपयांहून अधिक वाढविण्याचे एलआयसी म्युच्युअल फंडाचे लक्ष्य आहे.
फंड घराण्याची एकूण मालमत्ता चालू आर्थिक वर्षाअखेरीस १ लाख कोटी रुपयांवर नेण्याच्या व्यापक उद्दिष्टाला साजेसेच हे पाऊल असल्याचे झा यांनी स्पष्ट केले. सध्या एलआयसी म्युच्युअल फंडाच्या विविध वर्गवारीत ४१ योजना सुरू असून, एप्रिल २०२५ अखेर या योजनांची एकत्रित मालमत्ता (एयूएम) ३७,५५४ कोटी रुपये होती.