मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने भांडवली बाजारात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य सरलेल्या जून तिमाहीत १५.७२ लाख कोटी रुपयांपुढे पोहोचले आहे. देशातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार असलेल्या एलआयसीने एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत ९५ कंपन्यांमधील हिस्सेदारी कमी केली आहे.

हेही वाचा >>> Canara Bank Loans : कॅनरा बँकेचे कर्ज महागले

जूनअखेर तिमाहीत एलआयसीची भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या २८२ कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. एलआयसीचे भांडवली बाजारातील कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य मार्च २०२१ मध्ये ७.६७ लाख कोटी रुपये होते. ते आता दुपटीहून अधिक वाढून १५.७२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, अशी माहिती ‘प्राईमइन्फोबेस’च्या अहवालातून समोर आली आहे. सरलेल्या तिमाहीत एलआयसीने बँक ऑफ महाराष्ट्र, भेल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि गेलमधील हिस्सेदारी कमी केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधील गुंतवणूक ४.१० टक्क्यांवरून १ टक्क्यांवर आणली आहे. तर एलआयसीने इन्फोसिस, एलटीआय माईंड ट्री, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, टायटन, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँकेतील हिस्सेदारी वाढवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तिची सर्वाधिक हिस्सेदारी असून त्यापाठोपाठ आयटीसी, स्टेट बँक, टीसीएस आणि इन्फोसिसमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे. सरलेल्या जून तिमाहीत एलआयसीच्या भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या मूल्यात १० टक्क्यांची वाढ झाली आहे.