लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रला (महाबँक) डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत १,७७९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. याचबरोबर बँकेने १० टक्के अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
पुण्यात मुख्यालय असलेल्या महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी निधू सक्सेना यांनी चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीचे निकाल मंगळवारी जाहीर केले. बँकेला गत आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत १,४०६ कोटींचा निव्वळ नफा झाला होता. त्या तुलनेत यंदा तो २६.५ टक्क्यांनी वाढला आहे. बँकेचे तिमाहीतील एकूण उत्त्पन्न ८,२७७ कोटी रुपये झाले आहे. आधीच्या वर्षातील याच तिमाहीत ते ७,११२ कोटी रुपये होते.
बँकेने तिमाहीत ३,४२२ कोटी रुपयांचे निव्वळ व्याजापोटी उत्पन्न मिळविले. आधीच्या वर्षातील याच तिमाहीत ते २,९४३ कोटी रुपये होते. त्यात आता १६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. महाबँकेच्या एकूण बुडीत कर्जामध्ये घट होऊन त्यांचे प्रमाण १.६० टक्क्यांवर आले आहे. आधीच्या वर्षातील याच तिमाहीत हे प्रमाण १.८० टक्के होते. याचवेळी निव्वळ बुडीत कर्जांमध्येही घट होऊन त्यांचे प्रमाण ०.१५ टक्क्यांवर आहे. आधीच्या वर्षातील याच तिमाहीत हे प्रमाण ०.२ टक्के होते.
महाबँकेच्या संचालक मंडळाने प्रति समभाग १० टक्के लाभांश मंजूर केला आहे. बँकेच्या १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी १ रुपया लाभांश दिला जाणार आहे, अशी माहिती सक्सेना यांनी दिली.
गिफ्ट सिटीमध्ये ३.५ हजार कोटींचा व्यवसाय
बँकेने गुजरातमधील गांधीनगरमध्ये आयएफएससी बँकिंग युनिट (आयबीयू) सुरू केले आहे. हे युनिट सप्टेंबरमध्ये सुरू झाल्यापासून बँकेने ३ हजार ५४० कोटी रुपयांचा व्यवसाय तिथे केला आहे. हा व्यवसाय वर्षभरात १ अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट आहे, असे निधू सक्सेना यांनी सांगितले.
