scorecardresearch

प्रमुख निर्देशांकात १ टक्क्यांची पडझड

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ७७३.६९ अंशांनी (१.२७ टक्के) घसरून ६०,२०५.०६ पातळीवर बंद झाला.

प्रमुख निर्देशांकात १ टक्क्यांची पडझड
प्रमुख निर्देशांकात १ टक्क्यांची पडझड (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : जागतिक बाजारातून मिळणारे संमिश्र कल आणि त्यापरिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि तेल कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाल्याने बुधवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ७७३.६९ अंशांनी (१.२७ टक्के) घसरून ६०,२०५.०६ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २२ कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. निर्देशांकाने दिवसभरातील सत्रात ९०० अंश गमावत ६०,०८१.३६ या दिवसभरातील निचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २२६.३५ अंशांची म्हणजेच १.२५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो पुन्हा १८ हजार अंशांखाली जात १७,८९१.९५ पातळीवर बंद झाला.

हेही वाचा – एम. दामोदरन : रास्त, न्याय्य आणि परिपूर्ण

देशाचा आगामी अर्थसंकल्प आणि येत्या आठवड्यात अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची बैठक होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत नफा वसुलीला अधिक प्राधान्य दिले. दुसरीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आकर्षक मूल्यांकनांमुळे उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडे निधी हस्तांतरित करीत आहेत. तसेच संभाव्य मंदीसदृश परिस्थितीमुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये घसरण सुरू आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा – पोस्ट ऑफिसच्या ATM Card वर किती पैसे आकारले जातात जाणून घ्या

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्टेट बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी, टेक महिंद्र, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन ॲण्ड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, विप्रो आणि महिंद्र ॲण्ड महिंद्र यांच्या समभागात घसरण झाली. तर, हिंदुस्तान युनिलिव्हरचा समभाग १.१४ टक्के तेजीत होता. त्यापाठोपाठ मारुती, टाटा स्टील, एनटीपीसी आणि सन फार्मा यांचे समभाग वधारून बंद झाले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 23:35 IST

संबंधित बातम्या