पीटीआय, नवी दिल्ली
देशाच्या निर्मिती आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांच्या व्यवसायातील वेग सरलेल्या सप्टेंबर महिन्यात मंदावल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले. दोन्ही क्षेत्रांतील सक्रियता विद्यमान २०२४ सालातील नीचांकाला नोंदवल्या गेल्या असून, खासगी क्षेत्रातील अर्थव्यवस्थेच्या विस्ताराला मर्यादा पडल्याचे सर्वेक्षण स्पष्ट करते.
देशातील निर्मिती आणि सेवा क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या आणि क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया’द्वारे पार पडणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित ‘संमिश्र पीएमआय निर्देशांक’ सप्टेंबर महिन्यासाठी ५९.३ गुणांवर राहिला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये तो ६०.७ असा नोंदला गेला होता.
सप्टेंबर महिन्यामध्ये निर्यात कार्यादेश, विक्रीतील वाढीने जानेवारी २०२४ पासूनचा नीचांक नोंदविल्याचे दिसून आले आहे. नवीन निर्यात कार्यादेशांमधील वाढीचा वेग जानेवारीपासूनचा सर्वांत कमी नोंदविला गेला असला तरीही वाढीचा वेग दीर्घकालीन सरासरीपेक्षा चांगला राहिला. दरम्यान, सुधारित व्यावसायिक आत्मविश्वासामुळे रोजगारामध्ये सातत्याने वाढ होत आली आहे. सेवा क्षेत्राच्या रोजगारातील वाढ ऑगस्ट २०२२ पासून सर्वात वेगवान राहिली आहे. कारण सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नवीन कार्यादेश मिळविले आहेत, अशी माहिती एचएसबीसी इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी दिली.
किमतीच्या आघाडीवर, निर्मिती खर्च आणि महागाई या दोन्हींचे दर तुलनेने कमी होते, तर सेवा प्रदात्यांनी त्यांचे शुल्क कमी गतीने वाढवले आहेत. खासगी क्षेत्रातील निर्मिती संबंधित महागाईचा वेग ऑगस्टच्या तुलनेत किंचित वाढला आहे. उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये किरकोळ वेगाने त्यात वाढ दिसून आली. जेथे खर्च वाढला, तेथे कंपन्या सामान्यतः कच्चा माल आणि विजेच्या वाढीव किमतींशी संबंध जोडतात, असे सर्वेक्षणाने नमूद केले आहे.
हेही वाचा >>>दूरसंचार कंपन्यांना थकीत देणींबाबत दिलासा नाहीच!
रोजगाराच्या आघाडीवर, निर्मिती क्षेत्रातील रोजगारवाढीचा दर ऑगस्टच्या तुलनेत वाढला आहे. तर सेवा क्षेत्रातील रोजगारातील वाढदेखील ऑगस्ट २०२२ पासून सर्वाधिक आहे. कायमस्वरूपी कामगारांच्या नियुक्तीमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, निर्मिती क्षेत्रातील नोकऱ्यांच्या वाढीचा वेग काहीसा मंदावला आहे. अतिरिक्त कर्मचारी घेण्याबरोबरच, भारतीय उत्पादकांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या खरेदी क्रियाकलापांचाही विस्तार केला. यामुळे निविष्ठांच्या साठ्यात आणखी लक्षणीय वाढ होण्यास मदत झाली.
निर्मिती सेवा क्षेत्राचा विस्तार सप्टेंबर महिन्यातही सुरू राहिल्याचे दिसून येत आहे. नवीन कार्यादेश आणि उत्पादनातील वाढ काही प्रमाणात कमी झाल्याने, वेग काहीसा मंदावला जरूर आहे. रोजगाराच्या आघाडीवर मात्र सकारात्मक वातावरण आहे.-प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया