नवी दिल्ली : भारतातील उत्पादन क्षेत्राची वाढ जूनमध्ये १४ महिन्यांचा उच्चांक गाठणारी ठरली. एकूण वाढलेले उत्पादन, नवीन कार्यादेशांमध्ये सुधारणा आणि रोजगारात विक्रमी वाढ याचा हा सकारात्मक परिणाम राहिला, असे मासिक सर्वेक्षणातून मंगळवारी स्पष्ट झाले. देशातील कारखानदारीतील खरेदी व्यवस्थापकांमधील सर्वेक्षणावर आधारीत ‘एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय’ हा सरलेल्या जूनमध्ये ५८.४ गुणांवर नोंदविला गेला. मे महिन्यात हा निर्देशांक ५७.६ गुणांवर होता. ‘पीएमआय’च्या परिभाषेत, ५० पेक्षा जास्त गुणांक म्हणजे विस्तार, तर ५० पेक्षा कमी गुणांक हे आकुंचन दर्शविणारे ठरतात.
जूनमध्ये कंपन्यांकडे नोंदविल्या गेलेल्या नवीन कार्यादेशांच्या प्रवाहात जलद वाढ दिसून आली. विस्ताराचा दर जवळजवळ एका वर्षातील सर्वात मजबूत होता. विपणन प्रयत्नांमुळे आणि निर्यातीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे ही वाढ झाली. जूनमध्ये नवीन निर्यात कार्यादेशातील वाढीला लक्षणीय गती मिळाली, असे एचएसबीसीच्या मुख्य भारतीय अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या.
बाह्य अनुकूलता पथ्यावर
कंपन्यांनी २० वर्षांहून अधिक काळाच्या सर्वेक्षण इतिहासात बाह्य कार्यादेशांमध्ये सर्वात जलद वाढीची नोंद केली. विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीला तोंड देण्यासाठी, वस्तू उत्पादकांनी कच्चा माल खरेदी १४ महिन्यांतील सर्वाधिक प्रमाणात वाढवली, ज्यामुळे खरेदीच्या साठ्यात आणखी वाढ झाली. तथापि कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या तर सरासरी विक्री किमती उत्पादकांनी वाढविल्या. जोरदार विक्रीमुळे उत्पादकांकडून नवीन नोकर भरती वाढली, रोजगार विक्रमी वेगाने वाढला, असे अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी नमूद केले.