नवी दिल्ली : सध्या चीनने दुर्मिळ खनिज चुंबकाच्या (रेअर अर्थ मॅग्नेट्स) पुरवठा खंडीत झाल्याचा कंपनीच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी स्पष्टोक्ती मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सोमवारी केली. उल्लेखनीय म्हणजे तिची पितृकंपनी आणि जपानची आघाडीची वाहन निर्माती असलेल्या सुझुकी मोटरने लोकप्रिय ‘स्विफ्ट’ मोटारीचे उत्पादन याच कारणाने तात्पुरते थांबविले असल्याचे तीन दिवसांपूर्वीच जाहीर केेले आहे.
चीनच्या सरकारने दुर्मिळ संयुग घटक आणि संबंधित चुंबकांच्या निर्यातीवर ४ एप्रिलपासून लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भार्गव यांची वरील स्पष्टोक्ती आहे. वाहने, गृहोपयोगी उपकरणे आणि स्वच्छ ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या कच्चा माल म्हणून वापरल्या जाणाऱ्या सात दुर्मिळ संयुग घटक आणि चुंबकांसाठी विशेष निर्यात परवाने चीनने अनिवार्य केले असून, त्याच्या जागतिक प्रक्रिया क्षमतेच्या ९० टक्क्यांहून अधिकावर चीनचे नियंत्रण आहे.
या घटकांच्या कमतरतेमुळे प्रमुख जागतिक वाहन निर्मात्या कंपन्यांना उत्पादनात समस्या येत आहेत हे मान्य करतानाच, भार्गव यांनी त्यांच्या उत्पादनावर सध्या कोणताही परिणाम झालेला नसला तरी पुढील काही महिन्यांत तो जाणवेल, असे सूचित केले. या दुर्मिळ संयुग चुंबकांच्या आयातीसाठी चीन सरकारकडून परवाने मिळाले तर ते हवेच आहे. ही मंजुरीची प्रक्रिया जलद करण्यासाठी सरकारकडून मदतही मागितली आहे, असे ते म्हणाले.