पुणे : मर्सिडीज-बेंझकडून मर्सिडीज-मेबॅक या आलिशान एसयूव्ही मोटारीचे उत्पादन पुण्यात सुरू करण्यात आले आहे. कंपनीने प्रथमच अमेरिकेबाहेर या मोटारीचे उत्पादन सुरू केले असून, भारतीय बाजारपेठ डोळ्यासमोर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी संतोष अय्यर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. कंपनीकडून पहिल्यांदाच मर्सिडीज -मेबॅकसाठी भारताचा आघाडीच्या पाच जागतिक बाजारपेठांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मर्सिडीज-बेंझने २०२५ मध्ये भारतात १९ हजार ७ मोटारींची विक्री केली. कंपनीच्या आघाडीच्या मॉडेलच्या विक्रीत ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, इलेक्ट्रिक मोटारीच्या विक्रीत १२ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने महसुलाच्या दृष्टीने २०२५ हे आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष म्हणून नोंद केली आहे.

वस्तू सेवा करातील (जीएसटी) कपातीमुळे कंपनीच्या डिझेल मोटारींनी मागणी अधिक वाढली आहे. भारतात विक्री झालेल्या मर्सिडीज-बेंझच्या एकूण मोटारींमध्ये २० टक्के इलेक्ट्रिक आहेत. गेल्या वर्षभरात विक्री झालेल्या या मोटारींपैकी ७० टक्के मोटारी या १.२५ ते ३.१० कोटी रुपये किमतीच्या आहेत. कंपनीने मर्सिडीज-मेबॅक सेलिब्रेशन एडिशन बुधवारी सादर केली. याचबरोबर ईक्यूएस एसयूव्ही सेलिब्रेशन एडिशन ही मोटारही सादर केली.

मर्सिडीज-बेंझकडून भारतात लवकरच ‘एमबी चार्ज पब्लिक’ सुरू केले जाणार आहे. हे नेटवर्क चार्जिंग पॉइंट शोधण्यापासून ते त्याचे पैसे देण्यापर्यंतची सेवा देईल. ही सेवा ९ हजारांहून अधिक डीसी चार्जिंग पॉइंटवर कंपनीच्या सध्याच्या सर्व इलेक्ट्रिक मोटारींच्या ग्राहकांसाठी अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध असेल. याचबरोबर कंपनी राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांचा लोकांच्या जीवनावर झालेला परिणाम दर्शविणारा अहवालही जाहीर करण्यात आला आहे.

ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणार

यावेळी संतोष अय्यर म्हणाले की, मर्सिडीज-मेबॅक जीएलएसचे पुण्यात उत्पादन सुरू करण्याचा निर्णय भारतीय ग्राहकांप्रती कंपनीची दृढ बांधिलकी अधोरेखित करतो. या माध्यमातून कंपनीने ‘मेड इन इंडिया’ आलिशान एसयूव्ही सादर केली आहे. भारत आता मर्सिडीज-मेबॅकच्या आघाडीच्या पाच जागतिक बाजारांमध्ये स्थान मिळवत आहे. यातून टॉप-एंड वाहनांवर असलेले लक्ष दिसून येते. स्थानिक उत्पादनामुळे आमच्या मोटारींचे आकर्षण अधिक वाढेल. तसेच आमची जागतिक दर्जाची उत्पादन क्षमता आणि गतिशीलता अधोरेखित होईल. त्यातून अशा खास टॉप-एंड वाहनांसाठी सर्वात मागणी असलेल्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील.