पुणे : वस्तू व सेवा कर (जीएसटी) कपातीनंतर मर्सिडीजच्या पेट्रोल आणि डिझेल मोटारींच्या किमती सहा टक्क्यांनी कमी झाल्या आणि त्या परिणामी डिझेल मोटारींना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. यामुळे सध्या मर्सिडीजकडे डिझेल मोटारींचा तुटवडा असून, तो लवकरात लवकर भरून काढण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी संतोष अय्यर यांनी बुधवारी दिली.
जीएसटी कपातीमुळे मोटारींच्या विक्रीवर झालेल्या परिणामाबद्दल बोलताना अय्यर म्हणाले की, वाहन उद्योगाची स्थिती जुलै आणि ऑगस्टमध्ये फारशी समाधानकारक नव्हती. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या जीएसटी कपातीमुळे मागणीत वाढ होऊन उद्योगाला दिलासा मिळाला. याचा चांगला परिणाम ऑक्टोबरमधील वाहन विक्रीवर दिसून आला आहे. आमच्या कंपनीच्या पेट्रोल आणि डिझेल मोटारींच्या किमतीत जीएसटी कपातीनंतर सुमारे ६ टक्के घट झाली. यामुळे प्रथमच आमच्या प्राथमिक श्रेणीतील मोटारींच्या किमती ५० लाख रुपयांच्या खाली आल्या. यात ग्राहकांकडून पेट्रोलपेक्षा डिझेल मोटारींनी अधिक पसंती दिली.
पेट्रोलपेक्षा डिझेलच्या किमती कमी असल्याने ग्राहकांकडून या मोटारींना मागणी वाढली. अचानक वाढलेल्या या मागणीमुळे आमच्याकडे सध्या डिझेल मोटारींच्या तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. विशेष म्हणजे, आमच्या डिझेल मोटारींची किंमत पेट्रोल मोटारींपेक्षा २ ते २.५ लाख रुपयांनी जास्त असूनही ग्राहकांकडून ही मागणी वाढली आहे. प्रत्यक्षात इंधन कार्यक्षमता पाहता, मर्सिडीजच्या मोटारींसाठी डिझेलपेक्षा पेट्रोल अधिक किफातयशीर ठरते, असे अय्यर यांनी स्पष्ट केले.
विक्रीवर करांचा थेट परिणाम
सध्या महाराष्ट्रात आलिशान इलेक्ट्रिक मोटारींवरील कर शून्य टक्के आहे. यामुळे त्यांचे प्रमाण एकूण वाहनांच्या विक्रीत वाढले आहे. गुजरातमध्ये काही वर्षांपूर्वी या मोटारींवर जास्त कर होता. हा कर कमी झाल्यानंतर तिथे या मोटारींची विक्री वाढली आहे. आलिशान मोटारींच्या विक्रीवर कराचा थेट परिणाम होत असल्याचे दिसून येते, असेही अय्यर यांनी नमूद केले.
