लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

पुणे : देशातील यूपीआय व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. जानेवारी २०१८ मध्ये १५.१ कोटी यूपीआय व्यवहार झाले होते. यंदा जूनमध्ये या व्यवहारांच्या संख्येने ९.१ अब्जांचा टप्पा गाठला आहे. याच वेळी एकूण डिजिटल व्यवहारांमध्ये मोबाइलद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

देयक सेवा क्षेत्रातील ‘वर्ल्डलाइन’ने डिजिटल व्यवहारांचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, मासिक १० अब्जावधीपर्यंत पोहोचलेल्या यूपीआय व्यवहारांतील वाढीमागे प्रामुख्याने व्यक्ती ते व्यापारी पी (पीटूएम) व्यवहार वाढणे हे कारण आहे. देशात जानेवारी २०२२ मध्ये एकूण यूपीआय व्यवहारांमध्ये व्यक्ती ते व्यापारी व्यवहार ४०.३ टक्के होते. हे प्रमाण वाढत जाऊन यंदा जूनमध्ये ते ५७.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे प्रमाण आगामी काळात आणखी वाढत जाईल, असा अंदाज आहे.

आणखी वाचा-‘एसएमई आयपीओ’तील अनिर्बंध तेजीने चिंता वाढवली; गत १० वर्षात तब्बल १०,३५० टक्के परतावा

व्यवहारांची संख्या वाढण्यासोबत त्यांचे मूल्य कमी होताना दिसत आहे. जानेवारी २०२२ मध्ये व्यक्ती ते व्यापारी हे यूपीआय व्यवहार सरासरी ८५१ रुपयांचे होते. यंदा जून महिन्यात सरासरी व्यवहारांचे हे प्रमाण ६५३ रुपयांवर आले. त्यामुळे छोट्या रकमेच्या व्यवहारांसाठी यूपीआयचा वापर वाढल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वाधिक डिजिटल व्यवहार होणारी दहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, तेलंगण, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वाधिक पसंती यूपीआय व्यवहारांना दिली जात आहे. मोबाइलच्या माध्यमातून होणारे व्यवहार देशात आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढत जातील. केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही डिजिटल व्यवहारांची स्वीकारार्हता वाढली आहे. -रमेश नरसिंहन, मुख्य कार्यकारी अधिकारी. वर्ल्डलाइन

Story img Loader